लढत २०१० : बहुमताअभावी केडीएमसीत त्रिशंकू अवस्था
By admin | Published: October 13, 2015 01:52 AM2015-10-13T01:52:58+5:302015-10-13T01:52:58+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या २०१० च्या सार्वत्रिक निवडणुकीत मनसेची एण्ट्री झाल्याने ही लढत युतीविरुद्ध आघाडी अन् मनसे अशी तिरंगी झाली.
प्रशांत माने, कल्याण
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या २०१० च्या सार्वत्रिक निवडणुकीत मनसेची एण्ट्री झाल्याने ही लढत युतीविरुद्ध आघाडी अन् मनसे अशी तिरंगी झाली. परंतु, कोणालाच बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू अवस्था निर्माण झाली. मात्र, सत्ता स्थापनेच्या वेळी मनसेने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्याने अपक्षांच्या बळावर शिवसेना-भाजपा सत्तारूढ झाले. तटस्थ भूमिका ही एक प्रकारे शिवसेना आणि मनसेमधील अंडरस्टँडिंग असल्याचे म्हटले गेले.
या निवडणुकीतही शिवसेना-भाजपाची युती झाली होती. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीलाही आघाडी करणे भाग पडले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वबळावर यात उडी घेतल्याने निवडणूक तिरंगी आणि चुरशीची ठरली. यात शिवसेनेला ३१, भाजपाला अवघ्या ९, काँग्रेसला १५, राष्ट्रवादीला १४, मनसेला २७ तर ११ अपक्ष निवडून आले होते. निवडणुकीत पहिल्यांदाच उतरणाऱ्या मनसेने अनपेक्षित यश मिळवून सर्वात जास्त मते मिळविली. मनसेमुळे शिवसेनेचे अधिक नुकसान होईल, अशी शक्यता होती. परंतु, सेनेचे कमी तर सर्वाधिक नुकसान भाजपाचे झाले. काँग्रेस-राष्ट्रवादीलाही फटका बसला. या निकालानंतर कोणत्याच पक्षाला बहुमत नव्हते. मात्र, मनसेच्या तटस्थ भूमिकेमुळे अप्रत्यक्ष का होईना त्यांच्या पाठिंब्यावर सेनेला केडीएमसीत सत्ता राखता आली. २७ जागा पटकाविणारी मनसे विरोधी पक्षात बसली. सेनेला अप्रत्यक्षपणे केलेल्या सहकार्याची पोचपावती म्हणून विरोधी पक्षात असलेल्या मनसेला पाच वर्षांत परिवहन आणि महिला व बालकल्याण समित्यांचे सभापतीपदही उपभोगायला मिळाले.