बोस मैदानातील स्टेज, खोल्यांचे काम थांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 01:52 AM2019-12-28T01:52:24+5:302019-12-28T01:52:30+5:30

पाहणीनंतर आयुक्तांचे आदेश : खेळाडूंकडून तक्रारींचा पाऊस, शहरातील नागरिकांसाठी एकमेव मैदान

Stage in the Bose grounds, room work stopped | बोस मैदानातील स्टेज, खोल्यांचे काम थांबविले

बोस मैदानातील स्टेज, खोल्यांचे काम थांबविले

Next

भाईंदर : भार्इंदर पूर्वेला सामान्यांसाठी असलेल्या सुभाषचंद्र बोस मैदानात महापालिका आणि लोकप्रतिनिधींनी तब्बल ८० लाखांच्या खर्चाचे भले मोठे व्यासपीठ व आलिशान खोल्या बांधण्याचे काम सुरू केल्याने खेळाडू व नागरिकांनी विरोध केला आहे. आयुक्त बालाजी खतगावकर यांनी गुरुवारी पाहणी केली असता ही बाब चुकीची असल्याचे स्पष्ट करत काम थांबवण्याचे आदेश दिले.

मिठागराच्या जागेत कचरा व मातीभराव करून तयार केलेले बोस मैदान हे मुर्धा, भार्इंदर आदी भागांतील ग्रामस्थांनाच नव्हे तर शहरातील सर्वसामान्यांसाठी एकमेव मैदान आहे. या ठिकाणी सकाळी व सायंकाळी मोठ्या संख्येने खेळाडू व नागरिक खेळण्यासाठी येतात. त्यातही शनिवारी, रविवारी खेळाडूंची गर्दी असते. या आधी मैदान शनिवारी, रविवारी व सुटीच्या दिवशी हमखास खाजगी संस्था, व्यक्ती वा संघटनांना पालिका राजकीय संगनमताने भाड्याने देत होते. यामुळे खेळाडूंना हुसकावून लावले जायचे. अखेर, याप्रकरणी खेळाडूंच्या व्यथा आयुक्त बालाजी खतगावकर यांच्याकडे मांडल्यानंतर त्यांनीही गांभीर्याने दखल घेत शहरातील सर्वच खेळाची मैदाने शनिवारी, रविवारी भाड्याने देण्यास बंद केले. नियमाप्रमाणे वर्षातून केवळ ३० दिवसच मैदान हे धार्मिक कार्यक्रमांसाठी भाड्याने देण्याची तरतूद आहे. परंतु, त्याचेही सातत्याने उल्लंघन केले जात आहे.
दरम्यान, महासभेतील ठरावानंतर प्रशासनाने सारासार विचार न करताच तब्बल ८० लाख खर्चाचे स्टेज व आलिशान खोल्यांसाठी कंत्राट दिले. २०० फूट लांब व ३० फूट रुंद असे हे काम चक्क मैदानातच बांधण्यास घेतले. त्यासाठी मैदानात दगड आणून टाकण्यात आले. आधीच मैदान अपुरे असताना त्यात भरमैदानात पालिकेने हे काम सुरू केल्याने खेळाडू व नागरिक संतापले. त्यांनी थेट आयुक्तांची भेट घेऊन याला विरोध केला.

खतगावकरांनी कार्यकारी अभियंता दीपक खांबित, उद्यान अधीक्षक नागेश वीरकर यांच्यासह कामाची पाहणी केली. यावेळी मैदानातील नेहमीचे खेळाडू असलेले पोलीस निरीक्षक विजय पाटील, लाला माछी, हितेश माछी, अविनाश पाटील, विजय पाटील, पराग पाठारे, गणेश जाधव, वॅली रॉड्रिक्स, शैलेश म्हामुणकर आदींनी आयुक्तांकडे आपल्या तक्रारी केल्या. आयुक्तांनीही भरमैदानातील काम पाहून ते रद्द करण्यास तसेच पालिकेच्या पडीक टाकीजवळ ते प्रस्तावित करण्यासाठी आराखडा तयार करा, असे खांबित यांना सांगितले.

खेळाडू अधिकाऱ्यावर भडकले
सध्याच्या व्यासपीठाजवळच आकार वाढवून मुलींसाठी स्वच्छतागृह करा. इतका खर्च करून व्यासपीठाचा वापर वर्षातून दोन ते चार वेळाच होतो. यावेळी खांबित यांनी खेळपट्टी, मैदानासाठी नुकताच एक कोटी खर्च केल्याचे सांगताच खेळाडू संतप्त झाले. खेळपट्टी निकृष्ट, तर नेटही अवास्तव खर्चाने तयार केल्याचे सांगत एकूणच नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी थांबवा, अशी मागणी केली.

Web Title: Stage in the Bose grounds, room work stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे