‘पंतप्रधान आवास’चा रखडलेला अनुदानाचा हप्ता अखेर मिळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:37 AM2021-03-08T04:37:47+5:302021-03-08T04:37:47+5:30
ठाणे : ‘पंतप्रधान आवास योजनेच्या अनुदान हप्त्याअभावी घरकुले रखडली’ या मथळ्याखाली लोकमतने २० फेब्रुवारी रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. ...
ठाणे : ‘पंतप्रधान आवास योजनेच्या अनुदान हप्त्याअभावी घरकुले रखडली’ या मथळ्याखाली लोकमतने २० फेब्रुवारी रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन एक वर्षापासून शेवटच्या हप्त्याची रखडलेली २० हजारांची रक्कम मुरबाड तालुक्यातील चाफे शिरवाडी येथील राजेंद्र सोंगाळ यांच्या खात्यात जमा केली. त्यामुळे त्यांनी लोकमतसह प्रशासनाचे अभार मानले.
जिल्ह्यात आदिवासी, दुर्गम आणि ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील व मागासवर्गीय लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलांचा लाभ दिला जात आहे. या पाच वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यात सहा हजार ६४२ घरकुलांना मंजुरी मिळाली. त्यातील पाच हजार ७०५ घरे पूर्ण झाली असून, ९३७ घरकुले अपूर्णावस्थेत आहेत. शेवटचा हप्ता न मिळाल्यामुळे कर्ज काढून घर पूर्ण केल्याची गंभीर समस्या सोंगाळ यांनी लोकमतच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यास अनुसरून प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने तातडीने हालचाली करून शेवटच्या हप्त्याची २० हजार रुपयांची अनुदानाची रक्कम बँक खात्यात जमा केल्याचे सोंगाळ यांनी लोकमतला सांगितले.
..................