‘मराठा क्रांती मोर्चा’चा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 11:01 PM2018-07-21T23:01:32+5:302018-07-21T23:02:07+5:30
जिल्ह्यातील सकल मराठा समाज कार्यकर्त्यांनी बेमुदत ठिय्या आंदोलनास प्रारंभ केला
ठाणे : मराठा समाजाला तत्काळ आरक्षण द्यावे, समाजाला आरक्षण मिळेपर्यंत नोकरभरती बंद ठेवावी, यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन भरपावसात निदर्शने केली. यावेळी जिल्ह्यातील सकल मराठा समाज कार्यकर्त्यांनी बेमुदत ठिय्या आंदोलनास प्रारंभ केला. शासनाकडून लेखी आश्वासन मिळेपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धारही या कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
शासकीय विश्रामगृहासमोर सकाळी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आरक्षण लागू करण्यास राज्य शासनाकडून होत असलेल्या दिरंगाईविरोधात जोरदार निदर्शने केली. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकारने लेखी आश्वासन द्यावे, यासाठी आधीच १८ जुलैपासून परळीत ठोक आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी शुक्रवारी येथील सकल मराठा समाजातर्फे ठोक आंदोलनास प्रारंभ केला आहे. आरक्षण आमच्या हक्काचे... नाही कुणाच्या बापाचे, कोण म्हणतो देणार नाय... घेतल्याशिवाय राहणार नाय... आदी घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी येथील परिसर दणाणून सोडला. यानंतर या कार्यकर्त्यांनी बेमुदत ठिय्या आंदोलनास प्रारंभ केला. आंदोलनकर्त्यांनी सरकारकडे तातडीने आरक्षणाच्या आश्वासनाची अंमलबजावणी करण्याची मागणी लावून धरली आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात होते. हे ठोक आंदोलन मराठा समाजाच्या आरक्षणाचा दुसरा टप्पा असून कार्यकर्त्यांनी ते अभिनव पद्धतीने सुरू केले आहे. हक्काच्या आरक्षणासाठी राज्यभरात ठिकठिकाणी ५८ मूक मोर्चे काढूनही सरकार फक्त आश्वासन देत आहे. याप्रमाणेच आताही विधिमंडळाच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी महाभरतीमध्ये १६ टक्के जागा या मराठा समाजाला आरक्षित ठेवल्याचे आश्वासन दिले आहे. शैक्षणिक सवलती, हॉस्टेल, शिष्यवृत्ती, अॅट्रॉसिटी आदींबाबत सरकारने केलेल्या घोषणांची आजपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही. या आंदोलनात मराठा समाजातील असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.