सत्ताधारी भाजपाला टीकेची झोड उठताच उपरती; स्थायी समितीत अखेर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामास मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 08:04 PM2021-02-27T20:04:48+5:302021-02-27T20:05:27+5:30
मीरारोड - छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३० फुटी उंच पुतळ्याच्या कामास मंजुरी न देणाऱ्या मीरा भाईंदर महापालिकेतील सत्ताधारी भाजपावर टीकेची झोड उठल्या नंतर आता भाजपाला उपरती झाली आहे.
मीरारोड - छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३० फुटी उंच पुतळ्याच्या कामास मंजुरी न देणाऱ्या मीरा भाईंदर महापालिकेतील सत्ताधारी भाजपावर टीकेची झोड उठल्या नंतर आता भाजपाला उपरती झाली आहे. सोमवार २२ फेब्रुवारीच्या स्थायी समिती सभेत विरोध करणाऱ्या भाजपाने चौफेर टीका झाल्यावर शुक्रवारच्या स्थायी समिती सभेत मात्र महाराजांच्या पुतळा उभारणीच्या निविदेस मंजुरी दिली .
घोडबंदर किल्ल्याचे सुशोभीकरणचे काम सुरु असून त्या ठिकाणी जाण्यास मुंबई अहमदाबाद महामार्गावर सगणाई देवी मंदिर जंक्शन वरून रस्ता जातो. सदर जंक्शन वर रस्त्यांच्या मध्ये उपलब्ध होणाऱ्या मोकळ्या जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३० फूट उंचीचा भव्य पुतळा उभारण्याचा ठराव दोन वर्षां पूर्वी महासभेत सर्वानुमते करण्यात आला होता.
सदर पुतळ्याच्या २ कोटी ९५ लाख रुपयांच्या कामाची निविदा मंजुरीसाठी प्रशासनाने स्थायी समिती सभेत दिली होती . परंतु सत्ताधारी भाजपाने पुतळा उभारण्याच्या कामास मंजुरी देण्यास नकार दिला . भाजपाचे नगरसेवक दिनेश जैन यांनी मांडलेल्या ठरावास भाजपच्या नगरसेवक व सभापती अशोक तिवारी यांनी बहुमताने मंजुरी दिली .
विशेष म्हणजे भाजपाने महाराजांच्या पुतळ्यास विरोध करण्याची भूमिका घेतल्याने भाजपाचेच नगरसेवक सुरेश खंडेलवाल सभा सोडून निघून गेले होते .
महाराजांच्या पुतळ्यास विरोध केल्यावरून दिनेश जैन व भाजपावर विविध स्तरातून टीकेची झोड उठली . समाज माध्यमांवर सुद्धा नेटीझम्सनी भाजपाचा खरपूस समाचार घेतला . टेंडर टक्केवारी साठी महाराजांच्या पुतळ्याला विरोध केल्या पासून भाजपाचे महाराजां बद्दलचे दाखवले जाणारे प्रेम बेगडी असल्याचे आरोप झाले . अखेर शुक्रवारच्या स्थायी समितीच्या सभेत महाराजांचा पुतळा उभारण्याच्या कामाची निविदा भाजपा ठराव मांडून कडून मंजूर करण्यात आली .