‘आयुक्तांच्या अर्थसंकल्पाला’ स्थायी समिती सदस्यांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:44 AM2021-08-12T04:44:54+5:302021-08-12T04:44:54+5:30
ठाणे : आर्थिक वर्ष संपत आले तरी ठाणे महापालिका आयुक्तांनी १००-(अ) नुसार मंजूर केलेल्या अर्थसंकल्पानुसारच कामे सुरु असल्याचा ...
ठाणे : आर्थिक वर्ष संपत आले तरी ठाणे महापालिका आयुक्तांनी १००-(अ) नुसार मंजूर केलेल्या अर्थसंकल्पानुसारच कामे सुरु असल्याचा आरोप स्थायी समितीचे सदस्य हणमंत जगदाळे यांनी मंगळवारी केला. स्थायी समितीने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत पालिकेकडून अपेक्षित असलेली उत्तरे न मिळाल्याने सदस्य आक्रमक झाले असून न्यायालयात जाण्याचा इशारा जगदाळे यांनी दिला.
स्थायी समितीची बैठक सुरु होताच, जगदाळे यांनी ४ जून रोजी अर्थसंकल्पावर चर्चा झाली होती. त्यानंतर तब्बल दोन महिन्यानंतर बैठक का बोलावण्यात आली, असा सवाल केला. तसेच मागील बैठकीचे मिनिट्स मागितले होते त्याचे उत्तर दोन महिन्यानंतर देण्यात आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. स्थायी समितीने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी करण्याऐवजी आयुक्तांच्याच अर्थसंकल्पाचीच अंमलबजावणी का सुरु आहे, असा सवालही त्यांनी केला. स्थायी समिती सभापती हे महापौरांची भेट घेऊन यावर तोडगा काढतील, असे आश्वासन दिले होते; परंतु त्यावर अद्याप निर्णय न झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. नगरसेवकांची कामे झालेली नाहीत, प्रभागातील कामे रखडलेली असल्याचे त्यांनी सांगितले.
सदस्य कृष्णा पाटील आणि विक्रांत चव्हाण यांनी जगदाळे यांचा मुद्दा लावून धरला. स्थायी समितीने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. याशिवाय स्थायी समितीची सभा ऑफलाईन घेण्यात यावी, असा आग्रह धरला. बैठकीबाबत निर्णय झाला असतानाही सत्ताधाऱ्यांची मनमानी सुरु आहे, असे ते म्हणाले. समितीची बैठक ऑफलाईन घ्यावी अशी मागणी जगदाळे यांनीही केली.
यासंदर्भात महापौरांबरोबर चर्चा करुन अर्थसंकल्प कशा पद्धतीने मंजूर करता येईल यावर तोडगा काढला जाईल असे आश्वासन स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी दिले.
.........
वाचली