स्थायी वादात, नगरसेवक तोंडघशी
By admin | Published: January 10, 2016 12:26 AM2016-01-10T00:26:58+5:302016-01-10T00:26:58+5:30
पालिका स्थायी समितीने अत्यावश्यक कामांच्या नावाखाली कोट्यवधींच्या कामांना विनानिविदा मंजुरी दिली आहे. यातील बहुतांश कामे वादात सापडली असून नेताजी गार्डनच्या कामाच्या
- सदानंद नाईक, उल्हासनगर
पालिका स्थायी समितीने अत्यावश्यक कामांच्या नावाखाली कोट्यवधींच्या कामांना विनानिविदा मंजुरी दिली आहे. यातील बहुतांश कामे वादात सापडली असून नेताजी गार्डनच्या कामाच्या चौकशीचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. ठेकेदारांसह संबंधितांवर कारवाईची शक्यता निर्माण झाली असून त्या संबंधित नगरसेवक तोंडघशी पडले आहेत.
उल्हासनगर पालिका स्थायी समितीत काही आलबेल नसल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. समिती बैठकीतील माहिती पत्रकारांपर्यंत जाऊ नये, याची काळजी सत्ताधाऱ्यांसह विरोधी सदस्य घेत आहेत. सर्व विषय सर्वसंमतीने मंजूर होत असताना महासभेत एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे नाटक होत आहे. कलम ५(२)(२) कामाच्या नावाखाली निविदा न काढता कामाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली जात आहे. ही कामे निकृष्ट अथवा होतच नसल्याचे उघड झाले आहे.
स्थायी समितीने अत्यावश्यक कामांच्या नावाखाली नेताजी गार्डनच्या सुशोभीकरणाच्या कामाला मंजुरी दिली आहे. ३५ लाखांच्या निधीतून दुरुस्ती, नूतनीकरण तर ३ लाखांच्या अतिरिक्त निधीतून लायटिंगचे काम ठेकेदाराला देण्यात आले. दुरुस्तीविनाच निधी लाटल्याचा आरोप झाल्याने पत्रकारांनी आयुक्त मनोहर हिरे यांच्याकडे चौकशीची मागणी केली. कामाच्या चौकशीची मागणी होताच अचानक आठ दिवसांत फाइल गायब होऊन अधिकाऱ्यांची तारांबळ उडाल्याचा प्रकार समोर आला आहे.
- आयुक्तांनी चौकशीचा अहवाल दोन दिवसांत सादर करण्याचे आदेश लेखा विभागासह बांधकाम विभागाला दिले आहेत. काम न होताच बिल अदा केलेच कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.