स्थायीवरून साई अडचणीत
By admin | Published: May 2, 2017 02:26 AM2017-05-02T02:26:26+5:302017-05-02T02:26:26+5:30
पालिकेचे स्थायी समिती सभापतीपद भाजप आघाडीतील साई पक्षाच्या वाटेला गेले आहे. मात्र त्या पक्षातील कांचन लुंड, कविता पंजाबी
उल्हासनगर : पालिकेचे स्थायी समिती सभापतीपद भाजप आघाडीतील साई पक्षाच्या वाटेला गेले आहे. मात्र त्या पक्षातील कांचन लुंड, कविता पंजाबी, टोनी सिरवानी यांच्यात या पदासाठी जोरदार चुरस असून सभापतीपदावरून पक्षात उभी फूट पडण्याची भीती आहे. निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या वाटेवर असलेल्या लुंड यांना राज्यमंत्री चव्हाण यांनी पदाचा शब्द दिला असला, तरी पक्षप्रमुख जीवन इदनानी यांचा निर्णय अंतीम असेल.
उल्हासनगर पालिका निवडणुकीत ओमी टीमच्या मदतीने एकहाती सत्ता स्थापनेचे भाजपाचे स्वप्न भंग पावले. अखेर साई पक्षासोबत समझोता करून आणि अनेकांची मर्जी सांभाळत महापौरपद भाजपकडे खेचून आणण्यात राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यशस्वी झाले. त्यासाठी ओमी टीमला बाजुला सारून साई पक्षाला उपमहापौरपदासह स्थायी समिती सभापती पदासह प्रभाग व विशेष समिती सभापतीपदे द्यावी लागली. महापौर निवडणुकीच्या वेळी शिवसेनेच्या वाटेवर असणाऱ्या साई पक्षातील लुंड गटाला स्थायी समिती सभापतीपदाचे आमिष राजमंत्र्यांनी दाखविले होते. तसेच साई पक्षाचे प्रमुख नाराज होवू नये, म्हणून इदनानी यांचा निर्णय अंतीम असे लुंड यांना सांगण्यात आले होते. पण ज्या पद्धतीने ईदनानी यांच्या मागण्या भाजपाने मान्य केल्या आहेत, ते पाहता लुंड यांचीच सरशी होईल, असे त्यांच्या गटात मानले जाते.
भाजपचे वरिष्ठ नेते व माजी शहरजिल्हाध्यक्ष लाल पंजाबी यांना पक्षाने तिकिट नाकारले. त्यांनी ऐन निवडणुकीत साई पक्षात प्रवेश घेऊन पत्नी कविता पंजाबी यांना रिंगणात उतरविले. कविता सर्वाधिक मतांनी निवडून आल्या आहेत. त्यांनी कांचन लुंड यांच्याप्रमाणे स्थायी समिती सभापतीपदासाठी दावा केला आहे. साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी यांच्या सर्वाधिक जवळचे असणारे नगरसेवक टोनी सिरवानी यांचे नावही पुढे आले आहे. सिरवानी, कविता तोरणे-रगडे, ज्योती भटीजा व गजानन शेळके एकाच प्रभागातून निवडून आले. सिरवानी यांच्या प्रभागातील चारही नगरसेवकांचा त्यांना पाठिंबा आहे. तसेच ते पक्ष प्रमुख जीवन इदनानी यांच्या ते विश्वासातील असून महापौर मीना आयलानी यांचे ते जवळचे नातेवाईक आहेत. (प्रतिनिधी)
डावपेच आणि विश्वासात स्पर्धा
साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी यांच्या जवळचे व विश्वासातील म्हणून टोनी सिरवानी आहेत, तर कविता पंजाबी राजकारणात नविन असल्यातरी त्यांचे पती लाल पंजाबी भाजपाचे माजी शहरजिल्हाध्यक्ष लाल पंजाबी यांना राजकारणाचे डावपेच चांगले माहित आहेत.
२ ते ३ दिवसात स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीची तारिख जाहीर होईल आणि नव्याने घोडेबाजाराला सुरूवात होणार आहे. स्थायी समिती सभापतीपदाच्या शर्तीतून लुंड हळुहळू मागे पडत असून टोनी सिरवानी व कविता पंजाबी यांचे नाव समोर येत आहे.