बससेवा सुरू करा... लॉकडाऊन हटवण्यासाठी वंचितने वाजवली ‘डफली’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 03:14 PM2020-08-12T15:14:06+5:302020-08-12T15:16:23+5:30
लॉकडाऊन लादून सर्व व्यवहार बंद करण्यात आलेले आहेत. त्यामुळे टपरीवाले, फेरीवाले यांची आज उपासमार होत आहे. आज एसटी महामंडळावरही मोठ संकट आलं आहे.
ठाणे : कोरोनाला अटकाव आणण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. त्यामुळे गोरगरीबांना दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारने तत्काळ लॉकडाऊन हटवावा; एसटी आणि टीएमटी सेवा सुरु करावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वंचितचे राष्ट्रीय नेते अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार, ठाणे जिल्हा समन्वयक राजाभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी( दि. 12) खोपट एसटी स्टँडसमोर ‘डफली बजाओ’ आंदोलन छेडण्यात आले. मनाई आदेश झुगारुन हे आंदोलन करण्यात आले असल्याने सुमारे 40 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
लॉकडाऊन लादून सर्व व्यवहार बंद करण्यात आलेले आहेत. त्यामुळे टपरीवाले, फेरीवाले यांची आज उपासमार होत आहे. आज एसटी महामंडळावरही मोठ संकट आलं आहे. दोन महिने एसटीच्या कर्मचार्यांना पगार मिळालेला नाही. लॉकडाडाऊनमुळे गोरगरीबांचे जगणे असह्य झाले असल्याने हा लॉकडाऊन हटवून परिवहन सेवा सुरु कराव्यात,या मागण्यांसाठी अॅड. आंबेडकर यांनी ‘डफली बजाओ’ आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार, ठाण्यातील खोपट एसटी स्टँडसमोर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार डफली नाद केला. यावेळी, राजाभाऊ चव्हाण यांनी, “ कोरोनाच्या महामारीमुळे ठाणे जिल्ह्यातील नागरिकांची मोठी हानी होत आहे. सर्वच व्यवहार बंद असल्याने गोरगरीबांना जगणे असह्य होत आहे. त्यामुळे आता लॉकडाऊन हटविण्यात यावे; ठाणे शहरात टीएमटीच्या बसगाड्या सुरु कराव्यात; पश्चिम, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकण आदी भागात जाण्यासाठी एसटी बससेवा सुरु करावी; ई-पास पद्धती बंद करावी; असंघटीत कामगारांना अर्थसाह्य देण्यात यावे,” अशा मागण्या केल्या.
या आंदोलनात अमर आठवले, सुरेश कांबळे, बंडू वावळे, जनार्दन इंगळे, मारुती गायकवाड, भाऊ भागवत, तुकाराम कांबळे, राजेश भागवत, रघु भोसले, अविनाश अहिरे, नितीन तायडे, ए.आर. पटेल, अशोक आहेर, राजाराम ढोलम, शांताराम भिवसन, राजू मालवी, आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.