नालेसफाईला आजपासून प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:40 AM2021-05-10T04:40:08+5:302021-05-10T04:40:08+5:30
कल्याण : पावसाळ्याच्या ताेंडावर केडीएमसीकडून दरवर्षी नाल्यांची सफाई केली जाते. मनपाच्या हद्दीत ९४ नाले असून यंदा त्यांच्या सफाईच्या कामाला ...
कल्याण : पावसाळ्याच्या ताेंडावर केडीएमसीकडून दरवर्षी नाल्यांची सफाई केली जाते. मनपाच्या हद्दीत ९४ नाले असून यंदा त्यांच्या सफाईच्या कामाला सोमवारपासून प्रारंभ होणार आहे. मागील वर्षाप्रमाणे यंदाही कोरोनाचे सावट कायम राहिले आहे. काही नाल्यांची स्थिती पाहता प्रशासनाचे त्यांच्याकडे पुरते दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट होते. नाल्यांमध्ये नागरिक सर्रास कचरा टाकतात. तसेच काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात माती विटांचे डेब्रिजचे ढीगही नाल्यात जमा झाले आहेत. तत्काळ सफाई न झाल्यास पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नालेसफाईच्या कामांचे दरवर्षी कंत्राट दिले जाते. यंदा सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मनपाच्या जल-मलनि:सारण विभागामार्फत ही कामे केली जाणार आहेत. तर रस्त्यालगतच्या गटारांची साफसफाई घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रभाग क्षेत्र कार्यालयांच्या माध्यमातून करणार आहे. या कामांची दरवर्षी कंत्राटे दिली जातात. कंत्राटदारांकडून समाधानकारक कामे केली जात नाहीत, तसेच नियमांचे उल्लंघन केले जात असल्याची टीका लोकप्रतिनिधी सातत्याने करतात. काही वर्षांमध्ये काही महापौरांच्या दौऱ्यांमध्ये नालेसफाईच्या कामातील फोलपणा उघड झाल्याचे पाहायला मिळाले आहे. गेल्या वर्षी नालेसफाईदरम्यान कोरोनाचे सावट होते. त्यावेळी मात्र लोकप्रतिनिधींची राजवट होती. त्यावेळी त्या कामावर त्यांचा वॉच होता. नोव्हेंबर २०२० मध्ये लोकप्रतिनिधींची मुदत संपुष्टात आल्याने सध्या मनपात प्रशासकीय राजवट सुरू आहे. यंदाही कोरोनाचे सावट कायम राहिले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरश: कहर केला आहे. या प्रादुर्भावात नालेसफाईची कामे योग्य प्रकारे होतात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
----------------------------------------------------
कचरा, विटा, मातीचा भराव
कल्याण पश्चिमेतील गुरुदेव हॉटेलकडून रेल्वेस्थानकाकडे जाताना दोन्ही बाजूंना लागणाऱ्या जरीमरी नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा, माती-विटांचा भराव टाकण्यात आला आहे. वर्षभर त्याकडे दुर्लक्ष झाल्याने तिथली परिस्थिती अधिकच बिकट बनल्याचे दिसत आहे. त्यामुळे येथील कचरा आणि डेब्रिज काढताना प्रशासनाची चांगलीच कसोटी लागणार आहे. वेळीच येथील ढिगारे उचलले नाहीतर पावसात पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होऊन पूर परिस्थिती निर्माण होण्याची भीती स्थानिक व्यक्त करत आहेत.
------------------------------------------------------
फोटो आहे