पाथर्लीतील शवदाहिनी तातडीने सुरू करा - मनसे
By admin | Published: April 29, 2017 01:30 AM2017-04-29T01:30:21+5:302017-04-29T01:30:21+5:30
शहराच्या पूर्व भागात पाथर्ली येथे उभारण्यात आलेल्या शवदाहिनीचे तातडीने लोकार्पण करण्यात यावे, अशी मागणी
डोंबिवली : शहराच्या पूर्व भागात पाथर्ली येथे उभारण्यात आलेल्या शवदाहिनीचे तातडीने लोकार्पण करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांच्यासह विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर, संदीप म्हात्रे, विजय शिंदे, रवींद्र गरूड हे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. घरत यांनी निवेदनात म्हटले आहे की, पाथर्ली येथे आपणच पाठपुरावा करून शवदाहिनी उभारण्यास मंजुरी मिळवली. त्यासाठी ७५ लाख रुपये खर्च करण्यात आले आहे. शवदाहिनीचे काम ९० टक्के पूर्ण झालेले आहे. येत्या सात दिवसांच्या आत कामे मार्गी लावण्यात यावीत, अन्यथा मनसेच्या वतीने आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. डोंबिवलीत शिव मंदिर परिसरात एक शवदाहिनी आहे.
पाथर्ली येथील शवदाहिनी लवकर सुरू करण्यात यावी, याकरिता मनसेचा आग्रह आहे. मोराची गाडी, तरणतलाव सुरू करण्याच्या मागणीसाठी मनसे सक्रिय झाली व श्रेयाचे राजकारण सुरू झाले. आता शवदाहिनीच्या मुद्यावरून राजकारण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)