अवैध्य धंदे सुरु करा आणि सरकारला पैसे द्या राज्य सरकाराने चालविला धंदा - नाना पटोले
By अजित मांडके | Published: March 31, 2023 06:18 PM2023-03-31T18:18:51+5:302023-03-31T18:19:17+5:30
दंगल, मारपीट आणि रक्तपात होऊ द्या, असा सरकारचा उद्देश आहे.
ठाणे : छत्रपती संभाजीनगरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण होत असून त्याकडे लक्ष द्या, असे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी तसेच राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दावने यांनी पोलिस आयुक्त गुप्ता सांगितले होते. पण, त्यांनी केवळ दोन पोलिस पाठवून याकडे मुद्दामहून दुर्लक्ष केले आहे. याचाच अर्थ सरकारच्या सुचना पोलिस विभागाला आहेत. दंगल, मारपीट आणि रक्तपात होऊ द्या, असा सरकारचा उद्देश आहे. कारण याप्रकरणात कुणालाही अटक झालेली नसून पोलिस आयुक्त तिथेच बसून आहेत. पोलिस आयुक्त आणि अधिक्षकांना एकच काम दिलेले आहे, ते म्हणजे अवैध धंदे सुरु करा आणि त्यातून पैसे जमा करून सरकारला द्या. असा व्यवसाय सरकारने चालविला आहे का असा सवाल काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.
कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांची द्वेष भावनेने खासदारकी रद्द करणाऱ्या मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी ठाण्यात सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. त्यात पटोले सहभागी झाले होते. त्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलते होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावात म्हणजेच ठाणे शहरात सर्वसामान्य नागरिक सुरक्षित राहिलेला नसल्याचा आरोप करत हे सरकार तातडीने बरखास्त करण्याची मागणी राज्यपालांकडे करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
खासगीकरणाच्या माध्यातून प्रशासकीय सेवा संपुष्टात आणण्याबरोबरच आरक्षण संपविण्यात येत असून त्याचबरोबर शेतकरी आत्महत्या, बिघडलेली कायदा व सुव्यवस्था ही राज्यातील परिस्थिती राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. ठाण्यात पोलिसच नव्हे तर, सर्वसामान्य नागरिक सुरक्षित राहिलेला नाही. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या अंगरक्षकाचा मृत्यु हा संशयास्पद आहे.
पोलिसांवर दबाब आणला जातोय आणि त्यांना चुकीच्या कारवाया करण्यास भाग पाडले जातेय, त्यातूनच अशा घटना पुढे येत आहेत. या प्रकरणाचा तपास सुरु असल्याने त्यावर अधिक भाष्य करणार नाही. परंतु मला जे काही माहित आहे, ते संशयास्पद आहे. सरकारच्या माध्यातून दबाब वाढत चालला आहे. सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्कील झाले आहे, असा आरोपही पटोले यांनी केला.
देशात आणि राज्यात हिंदूचे सरकार असतानाही हिंदूंना न्याय मिळण्यासाठी आक्रोश मोर्चे कशासाठी काढावे लागत आहेत आणि भाजपच्या काळात जातीय दंगली का होतात, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. आव्हाड यांच्या अंगरक्षकाचा संशयास्पद मृत्यु, काँग्रेसचे पदाधिकारी गिरीश कोळी यांच्यावर झालेला हल्ला आणि ठाणे काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांना आलेली धमकी, याप्रकरणाकडे पोलिस विभाग लक्ष घालत नसेल तर पोलिस विभागावर नेमका दबाब कुणाचा आहे, माफिया की सरकार, हे स्पष्ट होणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. हिंदूच्या नावाने राज्यात तणाव निर्माण करण्याचे आणि धर्माधर्मात भांडणे लावण्याचे काम सुरु झाले आहे. देशात आणि राज्यात हिंदूचे सरकार आहे. या सरकारच्या काळात हिंदूंना न्याय मिळायला हवा आहे. परंतु हिंदूंचे सरकार असतानाही त्यांना आक्रोश मोर्चे कशासाठी काढावे लागत आहेत? हा प्रश्न उपस्थित होत असल्याचेही ते म्हणाले.
लोकशाही विघातक व्यवस्था सरकारच्या माध्यमातून तयार केली जात असेल तर त्याची दखल आणि माहिती घेऊन राज्यपालांनी सरकार बरखास्तची कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. राज्याचे सरकार नुपसक असल्याची टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. राज्याच्या इतिहासातील ही पहिली घटना आहेत. या सरकारने तातडीने राजीनामा देऊन बाजूला जायला पाहिजे होते. कारण हा शाहू, फुले आणि आंबेडकर विचारांचा अवमान आहे. तरीही राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की सर्वोच्च न्यायालयाने असे काहीच म्हटलेले नाही. त्यांना याबाबत काहीच माहित नसेल तर हे राज्याचे दुर्भाग्य आहे, असेही ते म्हणाले.