दिवा ते पनवेल लोकल सेवा सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:46 AM2021-08-13T04:46:27+5:302021-08-13T04:46:27+5:30
कल्याण : दिवा ते पनवेल लोकल सेवा तसेच एमएमआर क्षेत्रातील ठाणे व रायगडमधील रेल्वेस्थानकांवर अत्याधुनिक सोयी-सुविधा पुरवण्यासाठी सर्वंकष आराखडा ...
कल्याण : दिवा ते पनवेल लोकल सेवा तसेच एमएमआर क्षेत्रातील ठाणे व रायगडमधील रेल्वेस्थानकांवर अत्याधुनिक सोयी-सुविधा पुरवण्यासाठी सर्वंकष आराखडा तयार करावा, अशा मागण्या मनसे आमदार राजू पाटील यांनी गुरुवारी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केल्या आहेत. पाटील यांनी दिल्लीत दानवे यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले.
दिवा ते पनवेल लोकलची मागणी नागरिकांकडून होत आहे. दिवा ते पनवेलदरम्यान दातिवली, निळजे, तळोजा पंचानंद, नावडे रोड, कळंबोली, पनवेल अशी स्थानके असून, तेथे नागरी वस्ती वाढत आहे. सध्या दिवा ते रोहादरम्यान शटल सेवा आहे. मात्र, दररोज ठरावीक वेळेतच या गाड्या सुटतात. त्यामुळे नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबई, ठाणे येथे जाण्यासाठी निळजे, तळोजा येथील नागरिकांना आधी कल्याण, डोंबिवली, दिवा अथवा मुंब्रा स्थानक गाठून पुढील प्रवास करावा लागतो. त्यात त्यांचा वेळ, पैसा वाया जातो. परिवहन सेवाही अपुरी पडत असल्याने त्यांची प्रचंड गैरसोयही होत आहे. सध्या नवी मुंबई विमानतळाचेही काम सुरू झालेले आहे. त्याचाही बराचसा भाग या परिसराला जोडलेला आहे. तसेच या परिसरातून केंद्र सरकारचा मल्टिमॉडेल कॉरिडॉर जाणार असून, त्याचेही काम सुरू आहे. अशा मोठमोठ्या प्रकल्पांमुळे लोकसंख्या वाढत असताना सोयीस्कर दळणवळणाच्या दृष्टिकोनातून लोकल सेवा सुरू करावी, अशी मागणी पाटील यांनी पत्रात केली आहे.
कपिल पाटील यांचीही घेतली भेट
आ. राजू पाटील यांनी दिल्लीत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचीही भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच ठाणे जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली.
------------