सामान्यांसाठी रविवारी लोकल सेवा सुरू करा, प्रवासी संघटनेची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 01:16 AM2020-10-29T01:16:00+5:302020-10-29T01:17:46+5:30
Mumbai Suburban Railway News : मुंबईतील बहुतांश कार्यालयांना रविवारी सुटी असल्याने या दिवशी सर्व लोकल रिकाम्या धावतात. त्यामुळे रविवारी लोकल प्रवास खुला करावा
डाेंबिवली - सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सेवा कधीपासून सुरू होणार आहे, हे राज्य सरकारने तत्काळ स्पष्ट करावे. निदान पुढील काही दिवस रविवारी सामान्यांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी. मुंबईतील बहुतांश कार्यालयांना रविवारी सुटी असल्याने या दिवशी सर्व लोकल रिकाम्या धावतात. त्यामुळे रविवारी लोकल प्रवास खुला करावा, अशी मागणी करणारे पत्र उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेने राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन सचिव व रेल्वेशी समन्वय साधणारे अधिकारी अजय यावलकर यांना बुधवारी दिले.
संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी पत्रात आणखी काही मागण्या केल्या असून, त्याचा तातडीने विचार करावा, असे म्हटले आहे. लांब पल्ल्यांच्या गाड्यांनी बाहेरगावी प्रवासाला जाणाऱ्यांना अपडाउन मार्गांवर दादर, ठाणे, कल्याणपासून उपनगरांकडे लोकलने प्रवास करू दिला जात नाही. परिणामी, प्रवाशांना टॅक्सी-रिक्षाने पुढील उपनगरी प्रवासाचा भुर्दंड पडतो. अशा प्रवाशांना लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या तिकिटावरच लोकलचे तिकीट व लोकल प्रवासाची परवानगी मिळावी. तसेच एम इंडिकेटर ॲपवर अद्याप लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे जुने वेळापत्रक दर्शवले जात आहे. अनलॉकमध्ये ज्या लांब पल्ल्यांच्या गाड्या सुरू झाल्या आहेत, त्यांचे वेळापत्रक वेळोवेळी अपडेट करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
सर्वसामान्य महिलांप्रमाणे पुरुष आणि युवकांनाही सकाळी ११ ते दुपारी ३ व सायंकाळी ७ नंतर लोकल प्रवासाची मुभा मिळणे आवश्यक आहे. महिलांना सध्याच्या सवलतीत सकाळी नोकरीवर जाण्यासाठी प्रवास करता येत नाही. त्यामुळे त्यांना गर्दी सुरू होण्यापूर्वी म्हणजे सकाळी ८ पूर्वी प्रवासाची परवानगी द्यावी. त्यामुळे रस्ते प्रवासातील त्रासापेक्षा रेल्वेने तासभर लवकर ऑफिसला जाणे परवडेल, असे महिलांचे
म्हणणे असल्याचे देशमुख म्हणाले.
ट्रान्स-हार्बरवर अर्ध्या तासाने लोकल सोडा
ट्रान्स-हार्बरवर सध्या दर एक तासाने लोकल असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे किमान दर अर्ध्या तासाने पनवेल व वाशी मार्गावर लोकल सोडावी.
कर्जत-खोपोली सेक्शनवर लोकल सेवा, वसई-दिवा-पनवेल, रोहा सेक्शनवरील प्रवासीफेऱ्या पूर्ववत सुरू होणे गरजेचे आहे, आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत.