ठाण्यातील महापालिका उद्यानात निसर्ग वाचनालयांची सुरुवात, 'चला वाचूया' अभियानाचा पुढचा टप्पा

By अजित मांडके | Published: December 14, 2023 02:56 PM2023-12-14T14:56:36+5:302023-12-14T14:56:52+5:30

नौपाडा येथील गावदेवी मैदानाजवळील लोकमान्य टिळक उद्यान, कळवा येथील नक्षत्रवन उद्यान आणि वर्तकनगर येथील कम्युनिटी पार्क उद्यान या तीन उद्यानांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर निसर्ग वाचनालय सुरू करण्यात आली आहेत.

Start of Nature Libraries in Thane Municipal Park, the next phase of 'Chala Vachuya' campaign | ठाण्यातील महापालिका उद्यानात निसर्ग वाचनालयांची सुरुवात, 'चला वाचूया' अभियानाचा पुढचा टप्पा

ठाण्यातील महापालिका उद्यानात निसर्ग वाचनालयांची सुरुवात, 'चला वाचूया' अभियानाचा पुढचा टप्पा

ठाणे : सकाळचा सुखद प्रहर असो की सायंकाळचा रम्य प्रहर...निसर्गाच्या कुशीत, झाडांच्या सहवासात वाचनाची आवड जोपासायला कोणाला आवडणार नाही. ठाणेकरांसाठी ही सुखद संधी ठाणे महापालिकेने उपलब्ध करून दिली असून महापालिकेच्या काही उद्यानात निसर्ग वाचनालयांची सुरूवात करण्यात आली आहे. ठाणे महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वर्गखोल्यांमधील खुली वाचनालये म्हणजेच 'चला वाचूया' या अभिनव संकल्पनेचे हे पुढचे पाऊल असून उद्याने वाचन स्नेही बनविण्याचा प्रयत्न असल्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची सांगितले.

नौपाडा येथील गावदेवी मैदानाजवळील लोकमान्य टिळक उद्यान, कळवा येथील नक्षत्रवन उद्यान आणि वर्तकनगर येथील कम्युनिटी पार्क उद्यान या तीन उद्यानांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर निसर्ग वाचनालय सुरू करण्यात आली आहेत. या वाचनालयात, सध्या उद्यान विषयक, झाडे आणि प्राणी यांचे महत्त्व सांगणारी पुस्तके, विविध कादंबऱ्या, प्रवासवर्णने, कविता संग्रह, बालसाहित्य उपलब्ध आहे. उद्यानात येणाऱ्या नागरिकांना वाचनाची गोडी लागावी, तसेच, ज्यांना वाचनाची गोडी आहे त्यांना वाचनानंद मिळावा आणि त्यातून वाचनसंस्कृती वाढीस लागावी, असा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पुस्तकांचे वाचन मुख्य प्रवाहात (मेन स्ट्रीम) असणे ही काळाची गरज आहे. वारंवार पुस्तके दिसत राहिली तर वाचनासाठी नागरिक उद़्युक्त होतील. घरात, कार्यालयात, प्रवासात पुस्तकांची सहज उपलब्धता असेल, पुस्तकांचा सहवास लाभेल अशी व्यवस्था केली तर त्यातून वाचनाची ओढ निर्माण होईल, अशी या उपक्रमामागील भूमिका असल्याचेही आयुक्त श्री. बांगर यांनी सांगितले. महापालिकेने त्यासाठी एक छोटे पाऊल उचलले आहे, आता नागरिकांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

ठाणे महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरण विभागातर्फे सध्या तीन उद्यानांमध्ये नागरिकांसाठी विनामूल्य पद्धतीने वाचनालय सुरू करण्यात आले आहे. त्यापैकी कोणतेही पुस्तक वाचकांना उद्यानात बसून वाचता येईल. ही पुस्तके उद्यानाबाहेर नेता येणार नाहीत. उद्यानाबाहेर जाताना पुस्तक पुन्हा कपाटात ठेवणे आवश्यक आहे. वाचनालयाची वेळ आणि उद्यानाची वेळ सारखीच राहील.  सध्या या वाचनालयांसाठी सुमारे ८०० पुस्तके जमा झाली आहेत. ती वेगवेगळ्या सामाजिक संस्था, नागरिक, वाचनालये यांनी दिली आहेत. तीन उद्यानातील निसर्ग वाचनालयांना मिळणाऱ्या प्रतिसादातून पुढील वाचनालये सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

Web Title: Start of Nature Libraries in Thane Municipal Park, the next phase of 'Chala Vachuya' campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे