कोरोनाची रॅपिड टेस्ट सुरू करा, केडीएमसी आयुक्तांकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 01:14 AM2020-07-05T01:14:03+5:302020-07-05T01:14:45+5:30
सगळ्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पुणे महापालिकेच्या धर्तीवर रॅपिड टेस्ट सुरू केल्यास तातडीने रिपोर्ट उपलब्ध होऊन रुग्णावर तातडीने उपचार करता येतील.
कल्याण - कल्याण-डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संशयित आणि पॉझिटिव्ह रुग्णांपासून होणारा संसर्ग टाळण्यासाठी कोरोनाची रॅपिड टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी भाजप गटनेते शैलेश धात्रक यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.
महापालिका हद्दीत कोरोनाची टेस्ट घेतली जात आहे; मात्र त्याचे रिपोर्ट येण्यास बराच उशीर लागतो. कल्याण-डोंबिवली हद्दीत या आठवड्यात एका रुग्णाची मंगळवारी कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेण्यात आला. त्याचा अहवाल अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे रुग्ण व त्यांचे कुटुंबीय धास्तावलेले आहे. रिपोर्ट आलेला नसल्यामुळे त्याच्यावर कोरोनाचा उपचारही सुरू करता येत नाही.
रिपोर्ट नसल्याने कोरोनासाठी सध्या दिले जात असलेले इंजेक्शनही मेडिकलमधून दिले जात नाही. त्याचा मनस्ताप रुग्ण आणि त्याच्या कुटुंबीयांना सोसावा लागतो. एखादा रुग्ण आयसीयूमध्ये असल्यास त्याच्याकडे मोबाइल दिला जात नाही. त्याच्या कुटुंबीयांना आत सोडले जात नाही. त्यामुळे रुग्ण व त्याच्या कुटुंबीयांचा कुठलाही संपर्क राहत नाही.
या सगळ्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पुणे महापालिकेच्या धर्तीवर रॅपिड टेस्ट सुरू केल्यास तातडीने रिपोर्ट उपलब्ध होऊन रुग्णावर तातडीने उपचार करता येतील. रुग्णाचा रिपोर्ट मिळताच रुग्णालयात दाखल झाल्यावर त्याचा अन्य लोकांशी संपर्क येणार नाही, असे धात्रक म्हणाले.
मागील काही दिवसांपासून कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढत आहे. काहीवेळा उच्चांकही गाठला आहे. यावर आळा घालण्यासाठी पालिका क्षेत्रात पुन्हा लॉकडाऊन जाहीर केला आहे. रुग्णांची संख्या कमी होण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे.
खर्च पालिकेने उचलावा!
रॅपिड टेस्टसाठी केवळ ४०० रुपये खर्च येतो. सध्या २२०० रुपयांपेक्षा हा ४०० रुपये खर्च रुग्णांच्या खिशाला परवडणारा आहे. खर्च कमी असल्याने हा खर्च महापालिकेने उचलावा. राज्य सरकारकडून प्राप्त झालेल्या १७ कोटी रुपये निधीपैकी काही निधी हा टेस्टवर खर्च करण्यात यावा, अशी मागणी धात्रक यांनी आयुक्तांकडे केली आहे.