निकृष्ट दर्जाला चाप लावुन खड्डयांच्या दुरुस्तीला सुरुवात; वाटमारीला आयुक्तांचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 06:17 PM2017-09-29T18:17:06+5:302017-09-29T18:17:06+5:30
मीरा-भार्इंदरमधील वाहुतकीच्या रस्त्यांवर पडलेल्या खड्यांच्या दुरुस्तीत वाटमारी करुन निकृष्ट दर्जाचा वापर केला जात असल्याने आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी त्याला चाप लावून त्याची दुरुस्ती योग्य पद्धतीने करण्याची सक्त ताकीद अधिकारी व कंत्राटदारांना दिल्याने त्यातील वाटमारीला तूर्तास दणका दिल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरु झाली आहे.
- राजू काळे
भार्इंदर - मीरा-भार्इंदरमधील वाहुतकीच्या रस्त्यांवर पडलेल्या खड्यांच्या दुरुस्तीत वाटमारी करुन निकृष्ट दर्जाचा वापर केला जात असल्याने आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी त्याला चाप लावून त्याची दुरुस्ती योग्य पद्धतीने करण्याची सक्त ताकीद अधिकारी व कंत्राटदारांना दिल्याने त्यातील वाटमारीला तूर्तास दणका दिल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरु झाली आहे.
शहरातील रस्त्यांवर असंख्य खड्डे पडले असुन त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार काही राजकीय तसेच ुविविध सामाजिक संस्थांकडुन अनेकदा करण्यात येते. त्या तक्रारींवर तात्पुरत्या मलमपट्टीचे आश्वासन देऊन खड्डयाची दुरुस्ती प्रशासनाकडुन केली जाते. यामुळे दुरुस्त झालेले खड्डे पुन्हा उखडुन पालिकेने खर्ची घातलेला निधी खड्डयात जात असल्याची बाब चव्हाट्यावर येते. रस्त्यावरील बहुतांशी खड्डे गणेशोत्सवातही जैसे थे असल्याने मनसेने थेट गणपतीच्या प्रतिकात्मक उपस्थितीत पालिका मुख्यालयात आंदोलन करुन खड्डे अनंत चतुर्थीपर्यंत दुरुस्त करावेत, अशी मागणी प्रशासनाकडे केली होती. त्यावेळी प्रशासनाने खड्डे दुरुस्तीला सुरुवात केली खरी परंतु, कंत्राटदाराने खड्यांतील धुळ, माती व कचरा साफ न करताच खड्यांचे डांबरीकरण करण्यास सुरुवात केली. हा प्रकार थेट आयुक्तांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी कंत्राटदाराच्या कामातील निकृष्ट दर्जाला लगाम घालुन योग्य पद्धतीनेच खड्डे दुरुस्ती करण्याचे फर्मान सोडले. घटनास्थळी वरीष्ठ अधिका-यांना पाचारण करुन त्यांना कामावर नियंत्रण ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले. यानंतर काही खड्यांची दुरुस्ती करण्यात आली असली तरी आजही अनेक रस्त्यांवरील खड्डे जैसे थे आहेत. सततच्या खड्डे दुरुस्तीच्या मागणीला कंटाळून अखेर मनविसेचे शहर सचिव शान पवार यांनी खड्डे दुरुस्ती न करता वाहनचालकांच्या माहितीसाठी खड्डयांचे फलकच रस्त्याच्या कडेला लावावेत, अशी सुचना थेट परिवहन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांना निवेदनाद्वारे केली. दरम्यान आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार खड्डे दुरुस्तीसाठी सुचित केलेल्या पद्धतीचा वापर करण्यास कंत्राटदाराकडुन सुरुवात करण्यात आल्याचे आयुक्तांकडुन सांगण्यात आले. खड्डे दुरुस्तीपुर्वी त्यातील धुळ, माती, कचरा हवेच्या फवा-याने काढावी, खड्डे धुळमुक्त झाल्यासच त्यात टार (रसायनयुक्त डांबराचा द्रव पदार्थ) टाकावे. शेवटी त्यावर डांबरयुक्त खडी टाकून त्याचे सपाटीकरण करण्याच्या सुचना दिल्याप्रमाणे खड्डे दुरुस्तीला सुरुवात झाल्याचे आयुक्तांकडून सांगण्यात आले.