उल्हासनगर तहसील कार्यालयातील सेतुकेंद्र सुरू करा; मनसेची मागणी
By सदानंद नाईक | Published: July 3, 2024 07:39 PM2024-07-03T19:39:46+5:302024-07-03T19:40:00+5:30
सेतुकेंद्र विशिष्ट वेळेत सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा देशमुख यांनी दिला आहे.
उल्हासनगर : लाडली बहीण योजनेला गालबोट लागण्यापूर्वी तहसील कार्यालतील बंद असलेले सेतू केंद्र आठ दिवसात सुरू करण्याची मागणी मनसेची जिल्हाप्रमुख बंडू देशमुख यांनी प्रांत अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. सेतुकेंद्र विशिष्ट वेळेत सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा देशमुख यांनी दिला आहे.
उल्हासनगर तहसील कार्यालयातील सेतुकेंद्र गेल्या दिड वर्षांपासून सुरू बंद असल्यामुळे, नागरिकांना नाईलाजाने एजंटचा सहारा घ्यावा लागत आहे. त्यामुळे एका दाखल्यासाठी ३५ रुपये खर्च असतांना हजारो रुपये द्यावे लागत आहे. असा आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख व शहरप्रमुख संजय घुगे यांनी केला. सेतूकेंद्र तात्काळ सुरु करून शासनच्या लाडली बहीण योजनेला हातभार लावण्याची मागणी त्यांनी केली. शासनाच्या लाडकी बहीण ही योजना राबविण्यात येत असून त्यासाठी रहिवाशी दाखला व उत्त्पन्नाचा दाखला बंधनकारक आहे. त्यामुळे महिलांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी तहसील कार्यालयात मोठया प्रमाणात गर्दी होत आहे. परंतु हे दाखले देतांना ती व्यक्ती खरोखर महाराष्ट्राची रहिवाशी आहे का..? किती वर्षांपासून महाराष्ट्रात राहते. त्यांच्या आधारकार्ड वरील पत्ता हा महाराष्ट्राचा आहे का.? त्यांनी जमा केलेले कागदपत्र खरे आहेत का...? याची तपासणी होणे आवश्यक आहे. असे देशमुख यांचे म्हणणे आहे. ३ ते ४ हजार रुपये घेऊन, असे दाखले बनवून देणारी टोळी सक्रिय असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
प्रांत अधिकारी आनंदकुमार शर्मा व तहसीलदार कल्यानी कदम यांना निवेदन देतांना, मनसे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख, शहराध्यक्ष संजय घुगे, सचिन बेंडके, रवी पाल, शैलेश पांडव, अक्षय धोत्रे, संकेत शिंदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.