डहाणू-बोईसर-पनवेल मार्गावर गाडी सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:47 AM2021-09-08T04:47:57+5:302021-09-08T04:47:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वसई : कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होऊ लागला आहे. यामुळे लोकलसेवाही नियमांच्या चौकटीत राहून सुरू केली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होऊ लागला आहे. यामुळे लोकलसेवाही नियमांच्या चौकटीत राहून सुरू केली असताना, पनवेल ते डहाणू व बोईसर ते दिवा या मार्गावरील मेमू सेवा मात्र अजूनही सुरू केलेली नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
या ठिकाणच्या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना सध्या मोठ्या अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. या भागातील बहुतांश नागरिक हे मध्य रेल्वेवरून धावणाऱ्या डहाणू रोड-पनवेल आणि बोईसर-दिवा या मेमू गाड्यांमधून प्रवास करतात. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे येथील मेमू सेवा बंद आहे. त्यातच आता निर्बंध शिथिल होत असल्याने जनजीवन पूर्वपदावर येऊ आहे. लसीची दोन मात्रा घेतलेल्यांना राज्य शासनाने लोकल प्रवासाची मुभा दिली आहे. असे जरी असले, तरी मध्य व पश्चिम रेल्वे मार्गावरील मेमू सेवाही अद्यापही सुरू झालेली नाही. त्यामुळे दिवा, कल्याण, डोंबिवली, ठाणे आदी मध्य रेल्वे हद्दीतील कामगार व इतर जणांना वेगळ्या मार्गाने रेल्वे प्रवास करावा लागत आहे, तर हेच कामगार या गाड्यांचा वापर डहाणू रोड-विरार ते दिवा-पनवेल स्थानकापर्यंत प्रवास करण्यासाठी करीत होते, परंतु या सर्व सेवा बंद असल्याने त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी येण्या-जाण्यासाठी अडथळ्यांना आणि त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
...तर ताण होईल कमी
सध्या हे सर्व प्रवासी दादर-कुर्ला मार्गाने किंवा वांद्रे-पनवेल मार्गाने रेल्वे प्रवास करीत आहेत. डहाणू-पनवेल सेवा आणि बोईसर-दिवा सेवा सुरू केली गेली, तर किमान काही गर्दी कमी होऊन लोकलवरचा गर्दीचा भारही कमी होण्यास मदत मिळेल. यासाठी मेमू लोकल सेवा सुरू करावी, अशी मागणी डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेने रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
------------