येत्या पाच मे पासून सुरु होणार शहरातील ३०६ नाल्यांची सफाई, ठेकेदारांची संख्या मात्र होणार कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 03:55 PM2018-04-24T15:55:33+5:302018-04-24T15:55:33+5:30
पावसाळ्यात होणारी संभाव्य हानी टाळण्यासाठी येत्या ५ मे पासून शहरातील नाल्यांची सफाई करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. परंतु यंदा ठेकेदारांची संख्या मात्र कमी करण्यात येणार आहे.
ठाणे - शहरातील ११९ किमीच्या ३०६ नाल्यांची सफाई येत्या ५ मे पासून सुरु होणार आहे. नालेसफाई झाल्यानंतरही नाल्याच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टी भागातून पुन्हा नाल्यात कचरा टाकण्यात येत असल्याने आता यावर उपाय म्हणून या भागातून येणारा कचरा नाल्यापर्यंत आलाच नाही पाहिजे यादृष्टीने महापालिकेने शक्कल लढवली आहे. यासाठी झोपडपट्टी भागात घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासंदर्भात घरांचा सर्व्हे केला जाणार असून त्यानंतर घरोघरी जाण्यासाठी कचरा वेचकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. नाल्यामध्ये प्लास्टिक टाकण्यात येत असल्याने नाले तुंबण्याचे प्रकार होत होते. मात्र आता प्लास्टिक बंदी आल्यानंतर काही प्रमाणात नाले तुंबण्याचे प्रकार थांबणार असल्याचा विश्वास पालिकेने व्यक्त केला आहे. यावर्षी देखील नालेसफाईसाठी १० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. परंतु मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ठेकेदारांची संख्या मात्र कमी झाली आहे.
प्रभाग समिती निहाय नेलसफाईच्या कामाचे नियोजन करण्यात आले असून या कामांसाठी गेल्यावर्षी ६५ ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली होती. यंदा मात्र ठेकेदारांची संख्या कमी करण्यात आली आहे. गुढी पाडव्यापासून प्लास्टिक बंदी करण्यात आल्याने आता यावर्षी नाले तुंबण्याचे प्रमाण कमी होईल असा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र याचा परिणाम पुढच्या नालेसफाईमध्ये दिसेल असेही पालिकेने स्पष्ट केले आहे. आता नाल्यामध्ये आहे ते प्लास्टिक काढण्यात आल्यानंतर पुढच्या नालेसफाईमध्ये मात्र हा त्रास कमी होणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
दुसरीकडे नालेसफाईनंतर येणारी मुख्य समस्या म्हणजे एकदा नालेसफाई झाल्यानंतर झोपडपट्टीमधील नागरिक विशेष करून नाल्याच्या बाजूला असलेले नागरिक पुन्हा त्याच नाल्यात कचरा टाकत असल्याने सफाई करूनही नाल्यात कचरा साचतो. परिणामी नालेसफाईसाठी खर्च करण्यात आलेला निधी देखील वाया जात आहे. आता यावर महापालिकेने उपाय शोधून काढला असून कचरा वेचकच्या माध्यमातून घरोघरी जाऊन कचरा गोळा केला जाणार आहे. ज्या परिसरात घंटागाडी जाऊ शकत नाही अशा भागातूनच नाल्यामध्ये कचरा टाकला जात असल्याने आता स्वत: कचरा वेचक जाऊन हा कचरा गोळा करून आणणार आहे. त्यामुळे आता नाल्यात पडणाºया कचºयाची समस्या निकाली निघणार आहे.
ठाणे महापालिकेच्या हद्दीमधील नालेसफाईची कामे करण्यासाठी निविदा प्रक्रि येच्या कामाला सुरु वात करण्यात आली आहे. येत्या आठवडाभरात निविदा काढण्यात येतील अशी माहिती घनकचरा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. गेल्यावर्षी नालेसफाईच्या कामासाठी ६५ ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली होती. यावर्षी मात्र ठेकेदारांची संख्या कमी करण्यात येणार आहे. काही परिसरामध्ये ५ ते १० लाखांची नालेसफाईची कामे घेण्यात येत असल्याने अशा छोट्या कामांसाठी देखील ठेकरांची नियुक्ती करावी लागत होती. यासाठी प्रक्रि या देखील करावी लागत होती. हि प्रक्रि या टाळण्यासाठी छोट्या कामांचा समावेश मोठ्या कामातच करून घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
नालेसफाईवर जीपीएस आणि कॅमºयाचा वॉच -
गेल्या वर्षीप्रमाणेच ६२ झोन तयार करण्यात आले आहे. जीपीएस प्रणाली तसेच कॅमेराचा वॉच यावर्षी देखील असणार आहे. नालेसफाईनंतरही नाल्यामध्ये कचरा असल्याच्या नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी सफाईचे चित्रीकरण करण्यात येणार आहे.
खाडीचे प्रवाहही होणार साफ :
यावर्षी केवळ नालेसफाईच होणार नसून आता नालेसफाईबरोबरच खाडीचे प्रवाह देखील यावर्षीही साफ केले जाणार आहेत. शहरातील पाच सहा ठिकाणी असे खाडीचे प्रवाह आहेत जे नाल्यांना जोडले गेले आहेत. पूर्वी केवळ खाडी किनारी असलेल्या नाल्यांचे मुख महापालिकेच्या वतीने साफ केले जात होते. मात्र खाडीपर्यंत जाणारा खाडीचा संपूर्ण प्रवाह साफ न झाल्याने मुख साफ करूनही या प्रवाहामार्गे कचरा नाल्यामध्ये येत होता. यासाठी आता खाडीचे प्रवाह देखील साफ करण्यात येणार असून यासाठी भरती ओहोटीच्या वेळापत्रकाचा अभ्यास केला जाणार आहे. भरतीच्या वेळी हे प्रवाह साफ करणे शक्य नसल्याने या वेळापत्रकारावच प्रवाहाची सफाई करणे शक्य होणार असल्याचे घनकचरा विभागाने स्पष्ट केले
प्रभाग निहाय नाल्यांची संख्या
प्रभाग नाल्यांची संख्या नाल्याची लांबी
कळवा ४७ ०९
वर्तकनगर २५ १९
रायलादेवी ३७ १९
मुंब्रा ९२ ३१
कोपरी ११ ०४
उथळसर २४ ७.५
मानपाडा २६ १७
वागळे २० ०८
नौपाडा २४ ४.५
-----------------------------------
एकूण ३०६ ११९