ठाण्याच्या विविध विकास प्रकल्पांना राज्य शासनाची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 08:33 PM2018-11-01T20:33:22+5:302018-11-01T20:33:40+5:30

ठाण्याच्या विकासात महत्त्वाची भर घालणाऱ्या विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांना गुरुवारी राज्य शासनाची तत्त्वतः मंजुरी मिळाल्यामुळे एक महत्वाचा टप्पा गाठण्यात यश आले आहे.

State approval for various development projects in Thane | ठाण्याच्या विविध विकास प्रकल्पांना राज्य शासनाची मंजुरी

ठाण्याच्या विविध विकास प्रकल्पांना राज्य शासनाची मंजुरी

Next

 ठाणे - ठाण्याच्या विकासात महत्त्वाची भर घालणाऱ्या विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांना गुरुवारी राज्य शासनाची तत्त्वतः मंजुरी मिळाल्यामुळे एक महत्वाचा टप्पा गाठण्यात यश आले आहे. ठाण्यातील वाहतुकीच्या दृष्टीने आवश्यक असलेला कोस्टल रोड, श्रीनगर ते गायमुख फुट हिल रोड,शहरांतर्गत मेट्रो प्रकल्प, एसटी महामंडळाच्या अतिरिक्त जागेवर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल,पार्किंग सह अन्य सार्वजनिक सुविधा, नवीन ठाण्याचा विकास अशा विविध प्रकल्पांना तत्त्वतः मंजुरी देण्यात आली असून महापालिका,एमएमआरडीए, एमएसआरडीसी आदी संबंधित यंत्रणांना या प्रकल्पांचा सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याचे निर्देश गुरुवारच्या बैठकीत देण्यात आले.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोस्टल रोडला तत्वत: मंजूरी देऊन डीपीआर तयार करण्याचे निर्देश महापालिकेला देण्यात आले असून जमिनीची उपलब्धता तपासण्याचे आदेशही देण्यात आले. गायमुख ते खारबाव या खाडीपुलाचे काम एमएसारडीसी करणार असून डीपीआर तयार करण्याचे निर्देश गुरुवारच्या बैठकीत देण्यात आले.

ठाण्याचे मध्यवर्ती कारागृह स्थलांतरित करण्यासाठी पर्यायी जागा नव्या कारागृहाचे विकास आराखडे यांना अपर महानिरीक्षक, तुरुंग यांची मंजुरी घेण्याचे निर्देश ठाणे महापालिकेला देण्यात आले.

शहरांतर्गत मेट्रोसाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला असून महापालिका डीपीआर तयार करत आहे. शासनाला मंजुरीसाठी तो सादर करण्याचे निर्देश गुरुवारच्या बैठकीत देण्यात आले. त्याचप्रमाणे, कल्याण-ठाणे-वसई या जलवाहतुकीचा ६५० कोटी रुपयांच्या प्रकल्पाचा आराखडा ठाणे महापालिकेने केला असून त्यातील १०० कोटींच्या टप्प्याचे काम जेएनपीटीने महापालिकेच्या सल्ल्याने त्वरित सुरू करण्याचा निर्णयही गुरुवारच्या बैठकीत घेण्यात आला.

एसटी महामंडळाच्या जागेवर सुपर स्पेशालिटी रुग्णालय

एसटी महामंडळाच्या कळवा येथील अतिरिक्त जागेवर सुपर स्पेशालिटी बांधण्याबाबतचा प्रस्ताव सविस्तर आरखड्यासह मंजुरीसाठी परिवहन विभागाला पाठवण्याचे निर्देश बैठकीत महापालिकेला देण्यात आले. त्याचप्रमाणे, ठाणे स्थानकाबाहेर असलेल्या एसटी स्टँडच्या अतिरिक्त जागेवर पार्किंग आणि अन्य सार्वजनिक सुविधा विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याच्याही मंजुरीचा प्रस्ताव परिवहन विभागाला पाठवण्यात येणार आहे.

डायघर येथील प्रस्तावित एज्युकेशन हबलाही लवकरच मंजुरी अपेक्षित असून दिवा-आगासन रस्त्याचा डीपीआर सादर करण्याचे निर्देश एमएमआरडीएला देण्यात आले. कळवा-खारेगाव लिंक रोडचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

पीडब्ल्यूडी, झेडपी, महापालिका यांची एकत्रित कार्यालये

तलावपाळी जवळील पीडब्ल्यूडी, झेडपी,महापालिका यांच्या जुन्या वास्तूंचा पुनर्विकास करून पार्किंग सुविधेसह संयुक्त संकुल उभारण्यासही बैठकीत मंजुरी देण्यात आली.

Web Title: State approval for various development projects in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.