अत्याधुनिक ४० टोइंग वाहने आता दिमतीला
By admin | Published: May 1, 2017 06:15 AM2017-05-01T06:15:44+5:302017-05-01T06:15:44+5:30
टोइंग वाहनांकडून होणाऱ्या कारवाईबाबत ठाणेकरांमध्ये असलेली नाराजी दूर करण्याकरिता मुंबईच्या धर्र्तीवर ठाणे शहर
ठाणे : टोइंग वाहनांकडून होणाऱ्या कारवाईबाबत ठाणेकरांमध्ये असलेली नाराजी दूर करण्याकरिता मुंबईच्या धर्र्तीवर ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेमार्फत तब्बल ४० अत्याधुुनिक टोइंग वाहने सेवेत दाखल करून घेण्यात येणार आहेत. या वाहनांवर जीपीएस, ध्वनिक्षेपक, कॅमेरा व हायड्रॉलिक यंत्रणा असणार आहे. या वाहनांच्या खरेदीकरिता वाहतूक शाखेने ई-निविदा मागवल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाण्यातील वाहतुकीला अडथळा निर्माण करणारी वाहने टोइंग करण्यासाठी तसेच महामार्गावर बंद पडणारी अवजड वाहने बाजूला करण्यासाठी वाहतूक शाखेने चार प्रकारच्या वाहनांकरिता निविदा मागवल्या आहेत. यामध्ये दुचाकी वाहने टोव्ह करण्यासाठी २४, चारचाकी वाहनांसाठी ८, लहान क्रेन ५ आणि मोठ्या क्रेन ३ अशा एकूण ४० वाहनांचा समावेश आहे. डिझाइन, बिल्ट, आॅपरेट अॅण्ट मेन्टेन (डीबीओएम) या तत्त्वावर दीर्घकाळासाठी या वाहनांबाबत करार करण्यात येणार आहे. यासाठी ठाण्याचे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक समिती स्थापन केली असून ही वाहने मे २०१७ मध्ये नागरिकांच्या सेवेसाठी दाखल होतील, असा विश्वास ठाणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त संदीप पालवे यांनी व्यक्त केला.
(प्रतिनिधी)
असा असेल पारदर्शकपणा
वाहन टोव्ह करण्यापूर्वी त्याचा फोटो काढण्यात येईल व जीपीएस लोकेशनची नोंद केली जाईल. वाहनांचे हायड्रॉलिक पद्धतीने टोइंग केल्यामुळे कोणतेही नुकसान होणार नाही. तसेच किती वाहने टोव्ह केली, त्याबाबत नियंत्रण कक्षास वेळोवेळी सूचना दिल्या जाणार आहेत.
लहान गल्ल्यांमध्ये बेशिस्तपणे उभी केलेली वाहनेदेखील टोव्ह केली जाणार आहेत. याशिवाय, उच्च क्षमतेच्या क्रेनने रस्त्यावर बंद पडलेल्या बस व ट्रक बाजूला काढण्यात येतील. सर्वच वाहनांवरील कर्मचारी हे प्रशिक्षित व गणवेशधारी असणार आहेत.