राज्य उत्पादन शुल्कची अंबरनाथमध्ये कारवाई : गावठी दारुसह ४ लाखांचा ऐवज जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 06:27 PM2017-12-17T18:27:35+5:302017-12-17T18:41:10+5:30
ठाणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अंबरनाथ, डोंबिवली आणि ठाण्याच्या भरारी पथकाने अंबरनाथ येथील वेगवेगळया अवैध दारु अड्डयांवर शनिवारी पहाटेपासून दिवसभर धाडसत्र राबविले. या धाडीत १७ हजार २०० लीटर रसायन तसेच गावठी दारुसह चार लाख ११ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाण्याचे अधीक्षक नाना पाटील, कल्याणचे उपअधीक्षक रविकिरण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवलीचे निरीक्षक अविनाश रणपिसे, उपनिरीक्षक श्रीकांत खरात, अंबरनाथचे उपनिरीक्षक राजेश जाधव आणि ए. बी. पाटील आदींच्या तीन वेगवेगळया पथकांनी शनिवारी पहाटे १ ते ४ वाजण्याच्या दरम्यान अंबरनाथच्या मानेरा आणि वडोल गावात हे अचानक छापा टाकला. वडोल गावात एका ठिकाणी तर मानेरा गावातील तीन अशा चार वेगवेगळया अड्डयांवर राबविलेल्या या धाडसत्रामध्ये २१ हजार ५०० रूपयांची ४३० लीटर गावठी दारु, तीन लाख ४४ हजारांचे १७ हजार २०० लीटर दारु बनविण्याचे रसायन असा चार लाख ११ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन तो नष्ट केला. मानेरा गावातील मोकळया रानात सुरु असलेल्या बेकायदेशीर दारु निर्मिती प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तीन तर वडोल गावातील धाडसत्राबाबतचा गुन्हा अंबरनाथ पोलीस ठाण्यात असे चार गुन्हे दाखल झाले असून या भट्टी चालकाचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दारु अड्डयापासून रसायनाचा साठा अर्धा किलोमीटरवर
मानेरा गावात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दारु निर्मितीच्या अड्डयावर वारंवार धाडसत्र राबवूनही या पथकाच्या हाती फारसा ऐवज लागत नव्हता. दोन दिवसांपूर्वीही त्याठिकाणी कारवाई झाली हाती. तेंव्हाही विशेष मुुद्देमाल हाती लागला नव्हता. त्यामुळेच अत्यंत गोपनीयता राखून भल्या पहाटे भरारी पथकांसह तीन पथकांनी शनिवारी हे धाडसत्र राबविले. त्यावेळी दारु अड्डयापासून एका रबरी वाहिनीच्या आधारावर अर्धा किलोमीटर अंतरावर या पथकाला हजारो लीटर रसायनाचा साठा मिळाल्याचे एका वरीष्ठ अधिकाºयाने ‘लोकमत’ला सांगितले.