राज्य उत्पादन शुल्क विभागाचे हातभट्टी दारु अड्डयांवर धाडसत्र: गावठी दारुसह २९ लाखांचा मुद्देमाल जप्त
By जितेंद्र कालेकर | Published: June 28, 2024 07:57 PM2024-06-28T19:57:42+5:302024-06-28T19:57:53+5:30
भिवंडीच्या खाडीकिनारी एकाच ठिकाणी मिळाले ४०० ड्रम: अड्डा चालकांवर एमपीडीए अंतर्गत होणार कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे आणि कोकाणी विभागीय भरारी पथकांनी ठाणे, भिवंडी परिसरातील खाडी किनारी असलेल्या हातभट्टीच्या दारु निर्मिती अड्डयांवर धाडसत्र राबवून गावठी दारुसह २९ लाखांचा मुद्देमाल नष्ट केला. या कारवाईमध्ये एकाच ठिकाणी दारु निर्मितीसाठी लागणाऱ्या रसायनाने भरलेले ४०० ड्रम मिळाल्याची माहिती कोकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांनी शुक्रवारी दिली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभागीय उपायुक्त पवार आणि ठाण्याचे अधीक्षक डॉ. निलेश सांगडे यांच्या विविध भरारी पथकांसह उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे, भिवंडी आणि कल्याण येथील विभागीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी २६ जून २०२४ रोजी हातभट्टीवरील दारुचे समूळ उच्चाट करण्यासाठी ही कारवाईची मोहीम राबविली. यामध्ये विभागीय आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी भिवंडीतील अलिमघर आणि अंजूरगाव या खाडीमधील एकाच ठिकाणी असलेल्या सहा हातभट्टी दारुनिर्मितीच्या ठिकाणी रसायनाने भरलेले सुमारे ४०० ड्रम भरलेले मिळाले. या कारवाईमध्ये सात गुन्हे दाखल केले असून ही हातभट्टी निर्मिती करणारी ठिकाणेही उध्वस्त केली. यावेळी हातभट्टीची २४५ लीटर गावठी दारु, गावठी दारु निर्मितीसाठी लागणारे ७६ हजार २०० लीटर रसायन आणि इतर भट्टी साहित्य असा २९ लाख सहा हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे.
तीन बोटींमधून उपायुक्तांची धाड-
या कारवाईमध्ये कोकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांनी स्वत: तीन वेगवेगळया बोटींमधून जाऊन हातभट्टी केंद्रे उध्वस्त करण्याची मोहीम आपल्या पथकांसह राबविली. कारवाईची चाहूल लागताच दारुचे अड्डे चालविणारे माफीया पसार झाले असून त्यांची ओळख पटविण्यात आली आहे. त्यांच्याविरुध्द गुन्हे नोंदविण्याची कारवाई सुरु आहे. या आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९, आयपीसी कलम ३२८ अन्वये तसेच एमपीडीए कायद्यान्वये कारवाईचे आदेशही उपायुक्त पवार यांनी दिले आहेत. अशी कारवाई चालूच ठेवून हातभट्टी दारु निर्मिती ठिकाणे समूळ नष्ट करणार असल्याचा दावाही त्यांनी व्यक्त केला आहे.