ठाण्याच्या देसाई गावातील गावठी दारुच्या अड्डयांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 06:48 PM2018-01-29T18:48:20+5:302018-01-29T19:09:05+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे पथकाने देसाई गावातील खर्डी किनारी गावठी दारुच्या अड्डयांवर धाडसत्र राबवून २१ हजार २०० लीटर रसायनासह पावणे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करुन नष्ट केला.
ठाणे : डायघर भागातील देसाई गावातील खाडी किनारी असलेल्या गावठी दारुच्या अड्डयांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डी विभागाने सोमवारीधाडसत्र राबविले. या धाडीत दारु निर्मितीसाठी लागणा-या रसायनासह चार लाख ८१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोकण विभागीय उपायुक्त तानाजी साळुंखे, ठाण्याचे अधीक्षक एन. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डी विभागाचे निरीक्षक महेश बोज्जावार, उपनिरीक्षक जितेंद्र पाटील , पी. पी. घुले, सहायक दुय्यम निरीक्षक एम. टी. वरुळकर तसेच जवान एस. डी. पवार, प्रदीप महाजन आणि शैलेश कांबळे आदींच्या पथकाने २९ जानेवारी रोजी खर्डी ते आगासन दरम्यान असलेल्या खाडी किनारी भागात गावठी हातभट्टीवरील दारु निर्मितीच्या वेगवेगळया तीन अड्डयांवर सकाळी ८ ते १२ वा. च्या दरम्यान कारवाई केली. यामध्ये रसायनाने भरलेले २०० लीटर क्षमतेचे १०६ प्लास्टीकचे ड्रम, २०० लीटर क्षमतेचे रिकामे ३१ प्लास्टीकचे ड्रम, रसायनाने भरलेला एक मोठा ढोल तसेच २१ हजार २०० लीटर दारु निर्मितीचे रसायन असा चार लाख ८१ हजार ८०० रुपयांचा ऐवज जप्त करुन नाश केल्याची माहिती अधीक्षक नाना पाटील यांनी दिली. धाडीची चाहूल लागताच खाडी परिसरातून दारु निर्मिती करणा-यांनी पलायन केले. मात्र त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे निरीक्षक बोज्जावार यांनी सांगितले. याप्रकरणी डायघर पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याठिकाणी जप्त केलेले रसायन तसेच दारु बनविण्याची सामुग्री नष्ट करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.