राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाचा शहापूरमध्ये छापा: चार लाख ८२ हजारांचे विदेशी मद्य जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 10:41 PM2019-08-20T22:41:51+5:302019-08-20T22:51:14+5:30
शहापूर येथील सापगाव, भातसा नदीच्या पूलावरुन अवैध मद्याची वाहतूक करणाऱ्या मनोज मोरे याला बनावट विदेशी मद्यासह राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाने सोमवारी अटक केली.
ठाणे: दमण निर्मित विदेशी मद्याची बेकायदेशीरपणे वाहतूक करणा-या मनोज संजय मोरे याला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाने शहापूर येथील दहागाव येथून सोमवारी अटक केली. त्याच्याकडून चार लाख ८२ हजारांच्या मद्यासह १२ लाख ८४ हजार १२४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
शहापूर येथील भातसा नदीच्या ब्रिजवर सापगाव येथे अवैध मद्य वाहतूक एका कारमधून होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक सुधीर पोकळे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, कोकण विभागीय उपायुक्त सुनिल चव्हाण आणि अंमलबजावणी आणि दक्षता विभागाच्या संचालक उषा वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक सुधीर पोकळे, दुय्यम निरीक्षक अनिल राठोड, अे. बी. पाटील, जवान राजेंद्र शिर्के, दीपक घावटे, अविनाश जाधव, जगन्नाथ आजगावकर, मोहन राऊत, दीपक दळवी आणि सदानंद जाधव आदींनी १९ आॅगस्ट रोजी सापगाव येथील भातसा नदीच्या पूलावर केलेल्या वाहनांच्या तपासणीमध्ये एका संशयित कारमध्ये दमण निर्मित विदेशी मद्याचा साठा मिळाला. वाहनाचा चालक मनोज मोरे याच्या दहागाव (ता. शहापूर, जि. ठाणे) येथील घर झडतीमधून चार लाख ८२ हजार ३२४ रुपयांचे विदेशी मद्याचे ४१ बॉक्स आणि नामांकित कंपन्यांचे बनावट लेबल्स तसेच सेल फॉर महाराष्टÑ स्टेट ओन्ली असे नाव असलेले बनावट लेबल्सही बाटल्यांवर चिकटवलेले आढळून आले. याप्रकरणी मोरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दुय्यम निरीक्षक अनिल राठोड हे अधिक तपास करीत आहेत.