राज्य शासनाने ठामपाचे २३० कोटी मुद्रांक थकविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:43 AM2021-08-26T04:43:16+5:302021-08-26T04:43:16+5:30
ठाणे : कोरोनामुळे महापालिकेचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यातही मालमत्ता आणि पाणी करातून आर्थिक स्थिती थोडीशी सावरताना दिसत ...
ठाणे : कोरोनामुळे महापालिकेचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यातही मालमत्ता आणि पाणी करातून आर्थिक स्थिती थोडीशी सावरताना दिसत आहे. परंतु, राज्य शासनाकडून महापालिकेला अद्यापही दोन वर्षांपासून स्टॅम्प डय़ुटीची तब्बल २३० कोटींची रक्कम मिळालेली नाही. ती मिळाली तर रखडलेली कामे किंवा ठेकेदाराची बिले अदा करता येतील, अशी आशा प्रशासनाला आहे.
कोरोनामुळे महापालिकेला एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत ३७७ कोटींचे उत्पन्न मिळविता आलेले आहे. परंतु, दुसरीकडे कोरोनासाठी आतापर्यंत २३३ कोटींचा निधी खर्च झाला आहे; तर ७१० कोटींचे प्रस्ताव तयार आहेत. उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसविताना महापालिकेला तारेवरची कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे कोरोनाकाळात महापालिकेने राज्य शासनाकडून २०० कोटींच्या निधीची अपेक्षा केली होती. परंतु, अवघा ५१ कोटींचाचा निधी राज्य शासनाकडून मिळाला आहे. त्यामुळे उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ कसा बसवायचा, असा पेच आता प्रशासनाला पडला आहे.
दरवर्षी अंदाजपत्रक सादर करताना राज्य शासनाकडून येणाऱ्या निधीचा अंतर्भाव त्यात करण्यात येत असतो. त्यानुसार मागीलवर्षी आणि यंदा महापालिकेने राज्य शासनाकडून २३० कोटींची अपेक्षा केली होती. परंतु, दोन वर्षे उलटूनही पालिकेला ही रक्कम मिळालेली नाही.