इंदिरा गांधी रुग्णालयाकडे राज्य सरकारने लक्ष द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 01:00 AM2019-12-22T01:00:48+5:302019-12-22T01:00:59+5:30
रईस शेख यांची मागणी । सुविधांअभावी रुग्णांचे हाल
भिवंडी : भिवंडीतील इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांना पुढील उपचारासाठी मुंबई, ठाणे येथील रुग्णालयात जावे लागत असल्याने रु ग्णांसह रु ग्णांच्या नातेवाइकांची प्रचंड गैरसोय होते. सरकारने या रुग्णालयासाठी विशेष निधी जाहीर करून सुविधा त्वरित उपलब्ध कराव्यात, अशी मागणी भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
या रुग्णालयाला २०१३ मध्ये उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा राज्य सरकारने दिला आहे. मात्र, या उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना पुरेशा सुविधा मिळत नसून सुविधांचा बोजवारा उडाला असल्याने हिवाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्यावर आमदार शेख यांनी रुग्णांना आवश्यक उपचार मिळत नसल्याची बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्याचबरोबर आरोग्य विभागाच्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकांची सेवाही भिवंडीतील नागरिकांना योग्य रीतीने मिळत नसल्याची खंतही यावेळी त्यांनी व्यक्त केली.
या उपजिल्हा रु ग्णालयात २०० बेड, ट्रॉमा व अद्ययावत आयसीयू सेंटर लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणीही शेख यांनी केली आहे. प्रशासनाने तातडीने येथे सुविधा देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सुविधा देणे माझे कर्तव्य
भिवंडीतील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविणे, हे माझे कर्तव्य असून इंदिरा गांधी रुग्णालयाचा कायापालट केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, अशी प्रतिक्रि या आमदार रईस शेख यांनी व्यक्त केली.