"राजकीय मेळाव्यात दहीहंडी फोडली आणि जनआशीर्वाद यात्रेत गणपतीची मिरवणुक काढली तर चालेल काय?", ठाण्यात मनसेची पोस्टरबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 01:50 PM2021-08-25T13:50:18+5:302021-08-25T13:50:53+5:30
MNS Poster In Thane: मनसेकडून राज्यसरकार विरोधात एक पोस्टर झळकलं असून यात कोरोना असतानाही राज्यात सुरू असलेल्या राजकीय घटना आणि कार्यक्रमांवर शरसंधान करण्यात आलं आहे.
MNS Poster In Thane: राज्यात कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जनतेचा जीव वाचवण्याला प्राधान्य देत सण-वार काही काळ बाजूला ठेवण्याचं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. यात यंदाही दहीहंडी उत्सवाला सरकारनं बंदी घातली आहे. यावर मनसेकडून राज्यसरकारच्या निर्णयाचा कडाडून विरोध केला जात आहे. ठाण्यात याचाच प्रत्यय पाहायला मिळाला आहे. मनसेकडून राज्यसरकार विरोधात एक पोस्टर झळकलं असून यात कोरोना असतानाही राज्यात सुरू असलेल्या राजकीय घटना आणि कार्यक्रमांवर शरसंधान करण्यात आलं आहे.
"साहेब राजकीय मेळाव्यात दहीहंडी फोडली व जन आशीर्वाद यात्रेत, पक्ष प्रवेशाचे कार्यक्रमात यात गणपतीची मिरवणुक काढली तर चालेल काय?", असा सवाल उपस्थित करत मनसेने राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. पालघर-ठाणे मनसे जिल्हाध्यक्ष अनिवाश जाधव यांचं या पोस्टरवर नाव असून मनसेच्या प्रतिश मोरे यांनी हे पोस्टर लावलं आहे. त्यांच्यासोबतच इतर मनसे पदाधिकाऱ्यांचाही उल्लेख यावर आहे.
राज्यात कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडीला परवानगी नाकारण्यात आली आहे. यावरुन मनसेने आक्रमक भूमिका घेत दहीहंडी उत्सव साजरा करणारच अशी ठाम भूमिका घेतली आहे. यात मनेसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अनिवाश जाधव यांनी जय जवान गोविंदा पथकाच्या दहीहंडी सरावालाही उपस्थिती लावली होती. अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत गोविंदा पथकानं सरकारचे आदेश धुडकावून लावत दहिहंडीच्या सरावाला सुरुवात केली आहे.
कोरोनाचं कारण देत सण-वार साजरे करण्यावर राज्य सरकार निर्बंध लादत असताना दुसरीकडे राजकीय मेळावे आणि जनआशीर्वाद यात्रा काढल्या जात आहेत. यासाठी मोठी गर्दी होत आहे. सत्ताधारी पक्षाचे पक्षप्रवेश देखील सुरू आहे. तर युवासेनेकडूनही जोरदार कार्यक्रम घेतले जात आहेत. यावर बोट ठेवत मनसेनेनं राज्य सरकारवर टीका केली आहे.