ट्रेलर रस्त्यात रुतल्याने राज्यमार्ग बंद, कर चुकविण्यासाठी करतात या रस्त्याचा वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 01:22 PM2022-07-27T13:22:12+5:302022-07-27T13:22:48+5:30
कर चुकविण्यासाठी करतात या रस्त्याचा वापर
डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील दापचारी येथील सीमा तपासणी नाक्याचा (आरटीओ) कर चुकविण्यासाठी धुंदलवाडी-हळदपाडा - मोडगाव-उधवा अशा आडमार्गाचा वापर केला जातो. या मार्गावर दोन अतिअवजड मशीन वाहून नेणारे ट्रेलर चिखलात रुतल्याने अपघात होऊन धुंदलवाडी - उधवा राज्यमार्ग गेल्या तीन दिवसांपासून बंद पडला आहे. यामुळे नागरिकांची तसेच इतर वाहनचालकांची प्रचंड गैरसोय झाली असून, कोणताही शासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी किंवा पोलीस प्रशासन रस्त्यावर आडवा झालेल्या वाहनास बाजू करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुढे येत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील दापचेरी येथे गुजरात तसेच मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर सीमा तपासणी नाके आहेत. येथून अवैधरित्या अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाते. परंतु अशी वाहतूक करणाऱ्या काही वाहतूकदारांना सीमा तपासणी नाका चुकवून आडमार्गाने सहीसलामत बाहेर काढण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून काही टोळ्या कार्यरत आहे. खासकरून रात्रीच्या सुमारास ही चोरटी वाहतूक होत असते, मात्र या अवजड वाहनांच्या वाहतुकीवर कारवाई होत नसल्याने दरमहा सरकारचे लाखो रुपयांचे नुकसान होते. काही महिन्यांपूर्वी पालघर लोकसभेचे खासदार राजेंद्र गावित यांनी ही चोरटी वाहतूक बंद करण्यासाठी प्रयत्न केले; परंतु काही दिवसांनी पुन्हा तलासरी उधवा येथून मोडगाव-धुंदलवाडी-व सायवन-कासा-चारोटी अशी अवैध वाहतूक सुरू झाली.
दरम्यान, २४ जुलै रोजी मध्यरात्री धुंदलवाडी-उधवा रस्त्यावरील मोडगाव खिंडीत एक अवजड ट्रेलर आडवा झाल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणीच्या सामना करावा लागत आहे. राज्यमार्गावरील दळणवळण बंद झाले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने येथील आदिवासींना त्रास सहन करावा लागत आहे.
धुंदलवाडी-मोडगाव-उधवा हा रस्ता वाहतुकीस धोकादायक झाला आहे. या रस्त्यावरून बेकायदा अवजड वाहने जात असतात. त्यासाठी अनेक मोर्चे, आंदोलन, उपोषण, केले. परंतु काही झाले नाही. धुंदलवाडी पोलीस या रस्त्यावरून जाणाऱ्या अवैद्य वाहनांना मज्जाव करीत नसल्याची खंत आहे.
- काशीनाथ चौधरी, सदस्य, जिल्हा परिषद