अद्यावत ग्रंथालयाच्या उभारणीसाठी राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2018 03:33 PM2018-02-06T15:33:43+5:302018-02-06T15:34:20+5:30
प्रगती महाविद्यालयात अद्यावत ग्रंथालयाच्या उभारणीसाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कार्यशाळेला ग्रंथपालांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
डोंबिवली - प्रगती महाविद्यालयात अद्यावत ग्रंथालयाच्या उभारणीसाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कार्यशाळेला ग्रंथपालांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेच्या (नॅक) बदललेल्या निकषानुसार ग्रंथालये उभारणं आणि ग्रंथपालाच्या पदोन्नतीसाठी शैक्षणिक गुणवत्ता निर्धारणासाठी तयारी करणं या विषयांवर प्रगती महाविद्यालयांमध्ये राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत महाराष्ट्राच्या विविध भागातून 80 ग्रंथपाल सहभागी झाले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन माजी मंत्री व ठाणे जिल्हा आगरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील, मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथपालांच्या गुणवत्ता वृद्धीसाठी मसुदा तयार करण्याचे कार्य करणा-या समितीचे अध्यक्ष डॉ. देवाजित सरकार, प्रगती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अ. पां. महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. प्रगती महाविद्यालयातर्फे प्रथमच अशा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
जगन्नाथ पाटील म्हणाले, वाचाल तर वाचाल या युक्तीप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यानं महिन्याला किमान एक पुस्तक तरी वाचले पाहिजे. त्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम ग्रंथालयातून आखाले गेले पाहिजेत. ग्रंथालये अद्यावत असणे ही त्यासाठी गरजेचे आहे. ग्रंथालयातील विविध उपक्रम विद्याथ्र्यांर्पयत पोहोचविण्याचे काम ग्रंथपालांनी केले पाहिजे. विद्यार्थ्यांना ग्रंथालयात येण्यासाठी प्रवृत्त करा, असा सल्ला ही त्यांनी यावेळी दिला.
कार्यशाळेचा उद्देश
आपल्या लायब्ररी या नॅक दर्जाच्या कशा झाल्या पाहिजेत. ग्रंथालयाचा दर्जा चांगला असला पाहिजे. सध्याची पिढी ही मोबाइलाचा वापर जास्त करतात. त्यांच्यात वाचनाची गोडी लागावी. ग्रंथालयात विद्यार्थ्यांना काय सुविधा उपलब्ध करून द्यायच्या. ग्रंथालयात मासिके, जुनी पुस्तके आणणे, नवीन पुस्तके आणणे, ती पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, नवीन योजनांची विद्यार्थ्यांना माहिती देणे, विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा घेणे, महाविद्यालयाच्या वॉल मॅगेझिन आणि वेबसाइटवर नवीन माहिती टाकली जावी या उद्देशाने ही कार्यशाळा घेण्यात आली आहे.
कार्यशाळेतून साध्य काय होईल?
या कार्यशाळेत प्रत्येक ग्रंथपालांकडून काही नवीन आयडिया येत असतात. त्यांनी त्यांच्या महाविद्यालयात नवीन प्रकल्प काय राबविले असतील तर त्यांची माहिती मिळते. सर्वजण एकत्रित आल्याने एखादी आयडिया आवडल्यास महाविद्यालयाच्या प्राचार्याशी चर्चा करून तिची अंमलबजावणी केली जाऊ शकते. शंका निरसन या कार्यशाळेतून होत असल्याचे प्राचार्य महाजन यांनी सांगितले.