भाजपा नगरसेविकांत रस्सीखेच, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 03:13 AM2017-12-27T03:13:25+5:302017-12-27T03:13:29+5:30
डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीचे आगामी महापौरपद भाजपाच्या वाट्याला येणार असल्याने आणि त्यासाठी महिला ओबीसी आरक्षण असल्याने डोंबिवलीतील पाच तर टिटवाळयातील एक महिला नगरसेविकेत प्रचंड रस्सीखेच सुरू आहे.
अनिकेत घमंडी
डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीचे आगामी महापौरपद भाजपाच्या वाट्याला येणार असल्याने आणि त्यासाठी महिला ओबीसी आरक्षण असल्याने डोंबिवलीतील पाच तर टिटवाळयातील एक महिला नगरसेविकेत प्रचंड रस्सीखेच सुरू आहे. त्यातून नेत्यांमध्येही प्रसंगी अंतर्गत संघर्ष उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची कसोटी लागणार असून ते कोणाला झुकते माप देतात, याकडेच सगळयांचे लक्ष लागलेले आहे.
डोंबिवलीमधून ज्येष्ठ नगरसेविका प्रमिला चौधरी, मनीषा धात्रक, डॉ. सुनीता पाटील, फ प्रभागाच्या सभापती खुशबू चौधरी, विद्या म्हात्रे या इच्छुक असून टिटवाळयातील उपेक्षा भोईर यांच्याही नावाची जोरदार चर्चा आहे.
शिवसेना-भाजपा वेगवेगळे लढल्यानंतर भाजपाला पहिल्यांदाच महापालिकेत ४२ जागा मिळाल्या. त्यात डोंबिवलीकरांचा सिंहाचा वाटा आहे हे सर्वश्रुत आहे. त्यात चौधरी, धात्रक, भोईर यांना याआधीपासूनच नगरसेविकपदाचा अनुभव आहे. त्या तुलनेने डॉ. सुनीता, विद्या म्हात्रे, आणि खुशबू चौधरी यांची पहिली टर्म आहे. असे असले तरीही या सगळयांचीच नावे चर्चेत आहेत. त्यामुळे या सहा महिला इच्छुकांमध्ये डोंबिवलीकरांचे पारडे जड असतांना डोंबिवलीकडे झुकते माप द्यायचे की टिटवाळयाला संधी द्यायची, यापैकी नेमका कोणता निर्णय राज्यमंत्री चव्हाण घेणार हे बघणे औत्स्युक्याचे ठरणार आहे. ठाकुर्लीच्या प्रमिला चौधरी यांच्या घरात श्रीकर चौधरी आणि प्रमिला चौधरी असे सलग चार टर्म नगरसेवकपद आहे. तर मनिषा धात्रक व उपेक्षा भोईर यांची दुसरी टर्म आहे. पक्षश्रेष्ठींनी जर डोंबिवलीला ते पद द्यायचे ठरवले आणि नगरसेवक पदाची टर्म, अनुभव असे निकष लावल्यास महापौरपद या तिघींपैकी कुणाला मिळणार की नव्या चेहºयाला संधी मिळणार याची पक्षांतर्गतच उलट-सुलट चर्चा सुरु आहे.
भाजपामध्ये एवढ्या लवकर सत्तासंघर्ष होईल, अशी अपेक्षा पक्षनेत्यांनाही नव्हती. पण महापौरपदाच्या निवडीचे जसजसे दिवस कमी कमी होत जात आहेत तशी नवनवी समीकरणे बांधली जात आहेत. त्यात महिला महापौरपद आरक्षित असल्याने रस्सीखेचीला अधिकच रंगत आली आहे. डोंबिवलीला झुकते माप द्यावे तर नेमका कोणाला कल द्यावा यामुळे राज्यमंत्री चव्हाण यांची कोंडी आहे तर टिटवाळा हे खासदार कपिल पाटील व आमदार नरेंद्र पवार यांच्या मतदारसंघात येत असल्याने तिकडे संधी दिली जाऊ शकते की नाही हे बघणेही औत्स्युक्याचे ठरणार आहे.
या संघर्षातून चव्हाण जरी कसेबसे बाहेर पडले तरी भाजपाचा महापौर आणि स्थायीचे अध्यक्षपद मिळूनही राज्य शासनाने निधी दिला नाही, तर मात्र तोंडावर पडण्याची नामुष्की भाजपावर येणार आहे.
>‘स्थायी’साठी चढाओढ
पुरुष नगरसेवकांनाही अच्छे दिन येणार असल्याचे संकेत आहेत. स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी डोंबिवलीतील ज्येष्ठ नगरसेवक, गटनेते माजी उपमहापौर राहुल दामले; तर नवीन पण मितभाषी असा चेहरा असलेले स्थायीचे सदस्य, नगरसेवक संदीप पुराणिक यांची नावे चर्चेत आहेत; तर कल्याण पूर्वेमधील नगरसेवक मनोज राय यांचेही नाव चर्चेत आहे. लवकरच त्यासंदर्भातही निर्णय होणार असून भाजपाला विस्कटलेली आर्थिक घडी सुधावण्याची नामी संधी मिळणार आहे.