मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील उद्यानाची दुरावस्था; मृत जनावरांच्या अवशेषाने परिसरात दुर्गंधी, नागरिक हैराण
By रणजीत इंगळे | Published: September 12, 2022 02:14 PM2022-09-12T14:14:27+5:302022-09-12T14:15:23+5:30
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात पाचपाखडी येथील उद्यानाची दुरावस्था झाली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात पाचपाखडी येथील उद्यानाची दुरावस्था झाली आहे. हे उद्यान महापालिका मुख्यालयापासून आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर आहे. या उद्यानाची नियमितपणे साफसफाई होत नसल्याने जागोजागी कचरा साठलेला आहे, उद्यानातील जॉगिंग ट्रॅकचा काही भाग उखडलेला, उद्यानात एका ठिकाणी पडलेला काचांचा खच, कचरा टाकण्यासाठी लावलेले डबे या ठिकाणी गायब आहेत. दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच,सुरक्षा रक्षकांचा अभाव, ना झाडांची देखभाल,ना छाटणी ना हिरवळ ना स्वच्छता त्यामुळे गार्डन भकास ओसाड दिसत असल्याने ठाणे महानगरपालिका प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
मागील चार दिवसापासून या उद्यानात जॉगिंग ट्रॅकच्या लगत एक कुत्रा मरून पडलेला आहे त्याची दुर्गंधी संपूर्ण परिसरात पसरलेली असून देखील अद्याप पर्यंत कोणीही उचलण्यास किंवा विल्हेवाट लावण्यास आलेले नाही.
ठाणेकरांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी ठाणे पोलिसांनी पुढाकार घेत मॉर्निंग वॉक साठी सकाळी पाच ते सात या वेळेत ठाणे शहरातील तीनात नाका उपायुक्त कार्यालय ते धर्मवीर नाका सर्विस रोड वाहतुकीसाठी पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला होता त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी या ठिकाणी मॉर्निंग वॉक साठी होत असते. परंतु या सेवा रस्त्यालगत असलेल्या हुंडाई शोरूम ते सेल पंप समोरील उद्यानाची दुरावस्था झालेली आहे.
तरी कृपया वरील सर्व गोष्टींची गांभीर्यपूर्वक दखल घेऊन नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता बारा बंगला व ज्याप्रमाणे पूर्व द्रुतगती मार्गावरील ज्ञानसाधना कॉलेज ते तीन हात सेवा रस्ता लगत उद्यान, येथे सुशोभीकरण करण्यात येत आहे त्या धर्तीवर तातडीने पाचपाखाडी,नौपाडा येथील पूर्व द्रुतगती मार्गावरील उद्यानाचे सुशोभीकरण करण्यात यावे जेणेकरून मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या ठाणे नगरीचे सौंदर्यात भर पडेल.अन्यथा या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल असा इशारा काँग्रेसचे पदाधीकारी राहुल पिंगळे यांनी दिला.