राज्यातील पोलिसांना ‘कोरोना योद्धा पदक’ मिळवून देणार - पोलीस महासंचालक हेमंत नगराळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 11:07 PM2021-01-29T23:07:22+5:302021-01-29T23:48:56+5:30
आपल्या कुटूंबापासून दूर राहून कोरोनासारख्या साथीच्या आजाराच्या काळात धीरोदत्तपणे आपले कर्तव्य बजावणाऱ्या महाराष्ट्रातील पोलिसांना ‘कोरोना योद्धा विशेष पदक’ मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहे. नागरिकांच्या तक्रारीला प्राधान्य द्या, असा सल्ला राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी ठाण्यातील कार्यक्रमात शुक्रवारी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: आपल्या कुटूंबापासून दूर राहून कोरोनासारख्या साथीच्या आजाराच्या काळात धीरोदत्तपणे आपले कर्तव्य बजावणाऱ्या महाराष्ट्रातील पोलिसांना ‘कोरोना योद्धा विशेष पदक’ मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहे. अशा बाबीसाठी ते नकार देणार नाहीत, याची खात्री आहे. नागरिकांच्या तक्रारीला प्राधान्य द्या, असा सल्ला राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी ठाण्यातील कार्यक्रमात शुक्रवारी दिला.
कोरोनामुळे शहीद झालेल्या तसेच गेल्या दोन वर्षात पोलीस सेवेत असतांना मृत्यु पावलेल्या ७४ पोलीस पाल्यांना पोलीस सेवेत नियुक्तीचे पत्र देण्याचा विशेष कार्यक्रम ठाण्यातील साकेत येथील कवायत मैदानावर आयोजित केला होता. यावेळी आपले विचार मांडतांना नगराळे यांनी या विशेष पदकाबाबतचा मानस व्यक्त केला. ते म्हणाले, इतर राज्यांमध्येही कोरोना काळात कर्तव्य बजावणाºया पोलिसांना कोरोना वॉरियर्स म्हणून पदक देण्यात आले आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील पोलिसांनाही असेच पदक देण्याचा आपला मनोदय आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपण पाठपुरावा करणार असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील पोलिसांना अशी सेवा पदके प्रदान केली जातील, असेही ते म्हणाले. ठाणे पोलिसांनी कोरोना काळात चांगले कर्तव्य बजावले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी रक्तदानाचे आवाहन केल्यानंतर सर्वप्रथम पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या संकल्पनेतून ठाणे पोलिसांनी रक्तदान करुन रुग्णांचे जीव वाचविण्याचेही मोठे काम केले. कोरोनाकाळात राज्यातील सर्वच पोलिसांनी उत्कृष्ठ कार्य करुन एक आदर्श निर्माण केला. मात्र, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी या काळात मोठया संकटाशी सामना केला. स्थलांतरीत मजूरांना घरी पोहचविण्यासून ते रस्त्यावरील गर्दी नियंत्रणात आणणे अशी सर्वच कामे त्यांनी मोठया धीराने पार पाडली. अशा सर्वच पोलिसांचे कौतुक करुन शहीद पोलिसांच्या पाल्यांना नियुक्तीचे पत्र देण्याचा उपक्रम आयोजित केल्याबद्दल ठाणे पोलिसांचे त्यांनी कौतुक केले. असाच उपक्रम राज्यभर आयोजित केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
अनुकंपाबाबतची प्रक्रीया देखील वेळेत पूर्ण करुन ती तातडीने लागू केली. त्यामुळे आता कोरोनातील १९ तसेच उर्वरित गेल्या दोन वर्षातील ५५ अशा ७४ पोलीस पाल्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात येत आहे. याद्वारे त्यांना एकप्रकारे नविन पंख दिले जात असून प्रामाणिकपणे पोलिसांतील नोकरी करा, असा सल्लाही त्यांनी यावेळी या नविन पोलिसांना दिला. यावेळी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनीही गेली ११ महिने कोरोनासारख्या आजाराशी पोलिसांनी चांगल्या प्रकारे लढा दिला. यात ३४ पोलिसांना आपले प्राण गमवावे लागले. तर अनेक पोलीस कोरोनामुळे बाधित झाल्याचे सांगून कोरोनाकाळात झुंज देणाºया प्रत्येक पोलिसांचे त्यांनी कौतुक केले. शहीद पोलिसांमुळे पोलीस खात्याचेही मोठे नुकसान झाले असून ते कधीही भरुन न येणारे आहे. मात्र, आपला माणूस गेल्यानंतर पोलीस खात्याशी असलेली नाळ तुटू नये, अशी अनेक पोलीस कुटूंबियांची आशा होती. ती पूर्ण करण्याचे आश्वासन आम्ही दिले होते. त्याच आश्वासनाची पूर्ती आज होत असल्याचे फणसळकर यावेळी म्हणाले.
* तक्रारदारांना प्राधान्य द्या
या कार्यक्रमानंतर पोलीस महासंचालक नगराळे यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात गुन्हे आढावा बैठक घेतली. यावेळी नागरिकांच्या तक्रारीला प्राधान्य द्या. त्याचे निरसन होईपर्यंत पाठपुरावा करा. गुन्हेगारीच्या समूळ उच्चाटनासाठी मकोका आणि एमपीडीए सारख्या कायद्यांचा प्रभावीपणे वापर करा, असे आदेशही त्यांनी यावेळी दिले. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि सह आयुक्त सुरेश मेकला यांच्यासह सर्व अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त यावेळी उपस्थित होते.