राज्याने पेट्रोलवर घेण्यात येणारे अतिरिक्त कराचे 10 रुपये कमी करावे; रवींद्र चव्हाण यांनी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 07:23 PM2021-06-02T19:23:00+5:302021-06-02T19:23:07+5:30
एकनाथ शिंदे यांनी पाठपुरावा करावा आणि राज्यातील नागरिकांना दिलासा द्यावा असा टोला आमदार रवींद्र चव्हाण यांनी लगावला.
डोंबिवली: पेट्रोलने शंभरी पार केली हे वास्तव असले तरी राज्य शासन सुमारे २६ टक्के कर लावते, त्यातही सुमारे आणखी 10 रुपये जास्तीचे आघाडी सरकार घेत आहे, ते त्यांनी कमी करावेत आणि जनतेला दिलासा द्यावा. त्यातून दीड वर्षात करोडो रुपयांचा निधी राज्य शासनाने जमा केला आहे. त्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठपुरावा करावा आणि राज्यातील नागरिकांना दिलासा द्यावा असा टोला आमदार रवींद्र चव्हाण यांनी लगावला.
शिवसेनेने पेट्रोल दरवाढ विरोधात आंदोलन केले त्याबद्दल चव्हाण यांनी बुधवारी माध्यमांजवळ त्यांच्यामते जे वास्तव ते मांडण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की प्रति बॅरल चा रेट काय आहे याचा अभ्यास आघाडी सरकार करत नाही, त्यातच डोंबिवलित जे शिसवसेनेने आंदोलन केले त्यातून स्थानिक कार्यकर्त्यांचा अभ्यास किती कमी आहे हे दिसून येत आहे.
7 वर्षे केंद्र सरकारची यामध्ये 5 साडेपाच वर्षे शिवसेना देखील सत्तेत होती. तेव्हा दरवाढ दिसली नाही का? असा सवाल चव्हाण यांनी केला. सतत भाजपच्या कृतीवर बोलत रहायचे, टीका करायची, त्यालाही हरकत नाही, पण नागरिकांची दिशाभूल करू नका असा टोला त्यांनी लगावला.तसेच पालकमंत्री शिंदे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचे आहेत, त्यांनी तरी नागरिकांना दिलासा द्यावा, 10।रुपये कमी करुन द्यावेत. इथल्या स्थानिक आणि बाहेरून आलेल्यानी त्यासाठी पालकमंत्र्यांकडे हट्ट धरावा असेही ते म्हणाले. आंदोलन करताना ते राज्यात सत्तेत आहेत हे ते विसरत असतील, किंवा त्याना नागरिकांची दिशाभूल करायची आहे का? असे चव्हाण।म्हणाले.