राज्य नाट्य स्पर्धा आजपासून
By admin | Published: November 7, 2016 02:51 AM2016-11-07T02:51:15+5:302016-11-07T02:51:15+5:30
सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत होणाऱ्या ५६ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटय स्पर्धेची ठाण्यातील प्राथमिक फेरी सोमवार ७ नोव्हेंबरपासून रंगणार आहे
ठाणे : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत होणाऱ्या ५६ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटय स्पर्धेची ठाण्यातील प्राथमिक फेरी सोमवार ७ नोव्हेंबरपासून रंगणार आहे. ही फेरी २५ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार असून याअंतर्गत विविध नाट्य कलाकृती डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या मिनी थिएटरमध्ये सादर केल्या जाणार आहेत.
उदयोन्मुख कलाकरांना हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदाच्या ५६ व्या स्पर्धेच्या ठाणे केंद्रावरील प्राथमिक फेरीत एकूण १७ नाटयसंस्था सहभागी झाल्या असून, स्पर्धेत धोकादायक इमारत, बीज, आग्य्राहून सुटका, आय डी, मी अनिकेत सहास्त्रबुद्धे, हे खेळ माणसांचे, सख्या हौस माझी पुरवा, अवलक्षण, रंगारी, फुल्ली गोळा, विठ्ठल विठ्ठल, फ्लॅश, खट्टा मिठा, कॉम्प्रमाइज, लेडीज सायकल, सखाराम बार्इंडर, स्वप्नसावल्या या नाटकांचे प्रयोग सादर होणार आहेत. सोमवारपासून दररोज सायंकाळी ७ वाजता हे प्रयोग रंगणार आहेत.
ठाणे केंद्रावर होणाऱ्या स्पर्धेत ठाणे, नवी मुंबई, मुंब्रा, महाड, पालघर, अलिबाग, पनवेल येथील हौशी नाट्यसंस्थांचे नाट्याविष्कार
पाहता येणार आहेत. या केंद्रावर सर्वोत्कृष्ट ठरलेल्या नाटकाला अंतिम फेरीत प्रवेश मिळणार आहे. (प्रतिनिधी)