राज्य परिवहन सेवेच्या बसला विटाव्यात आग, ४० प्रवासी थोडक्यात बचावले
By जितेंद्र कालेकर | Updated: February 26, 2024 00:28 IST2024-02-26T00:27:32+5:302024-02-26T00:28:04+5:30
अग्निशमन दलाच्या जवानांनी आग तातडीने आटोक्यात आणली. या घटनेत ४० ते ४५ प्रवासी बचावल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज्य परिवहन सेवेच्या बसला विटाव्यात आग, ४० प्रवासी थोडक्यात बचावले
जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: राज्य परिवहन सेवेच्या (एसटी) बसला कळव्यातील विटाव्याजवळ आग लागल्याची घटना रविवारी सकाळी ८:१५ वाजता घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग तातडीने आटोक्यात आणली. या घटनेत ४० ते ४५ प्रवासी बचावल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विटावा ब्रिजजवळ कळवा वाहतूक पोलिस चौकीजवळ कोळीवाडा प्रवेशद्वारसमोर, गणपती पाडा भागात खोपट बस डेपोहून (पनवेल, खोपोली मार्गे) पालीकडे जाणारी एसटी बसचालक सचिन दीपक शंभरकर आणि वाहक विद्या मोहिते हे घेऊन जात होते. साधारण सकाळी ८:१५ वाजता बसच्या इंजिनमध्ये आग लागली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी कळवा पोलिसांसह आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी एका पिकअप वाहनासह आणि अग्निशमन दलाचे जवान एका रेस्क्यू वाहनासह दाखल झाले. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलातील जवानांच्या मदतीने सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली. ही आग बसमधील चालक, वाहक, स्थानिक रहिवासी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सकाळी ८ वाजून २८ वाजताच्या सुमारास पूर्णपणे आटोक्यात आणण्यात यश मिळवल्याची माहिती सूत्रांनी दिली.