ठाण्यातील शिवसेना नगरसेवकाची पत्नीला मारहाण: जिवे मारण्याचीही धमकी दिल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 09:49 PM2018-02-06T21:49:13+5:302018-02-06T22:05:10+5:30
नगरसेवक गणेश कांबळे यांच्याविरुद्ध मारहाणीची तक्रार देणा-या त्यांच्या पत्नीलाच कळवा पोसिलांनी आधारकार्डसह इतर पुरावे मागितल्याचा आरोप आहे. दरम्यान, कांबळे यांच्यावर तडीपारीचाही प्रस्ताव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ठाणे : शिवसेना नगरसेवक गणेश कांबळे या पतीने आपल्या गळ्यावर सुरी ठेवून ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर केस ओढून भिंतीवर डोकेही आपटले. मिळेल त्या काचेच्या भांड्यानेही डोक्यात प्रहार केला. अमानुषपणे मारहाण होत असताना मध्यस्थी करणा-या स्वत:च्या आईलाही त्यांनी मारहाण केली. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी कॅरलीन कांबळे यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे केली आहे.
कॅरलीन यांनी या संदर्भात कळवा पोलिसांकडेही २८ जानेवारी २०१८ रोजी तक्रार दाखल केली. कॅरलीन यांना पहिल्या पतीपासून सनी (१५) आणि जिशॅन (१५) ही दोन तसेच एक दत्तक मुलगा होता आणि गणेश यांच्याशी प्रेमविवाह झाल्यानंतर दोन अशी पाच मुले आहेत. गणेश यांना त्यांचे वडील मल्लिकार्जून यांनी त्यांच्या दुसºया पत्नीमुळे गणेशसह त्यांच्या कुटुंबीयांना घराबाहेर काढले होते. त्यावेळी गणेश यांना कॅरलीन यांनी भावनिक आणि आर्थिक आधार दिला. ९ जून २०१३ रोजी गणेश यांच्याबरोबर मंदिरामध्ये विवाह केला. दरम्यान, एका मारहाण प्रकरणात गणेश यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप लागला. यात गणेश आणि त्यांच्या वडिलांनाही अटक झाली होती. या प्रकरणात जामीनासाठीही पत्नी या नात्याने मदत केल्यामुळे सहा महिन्यातच त्यांची जामीनावर सुटकाही झाली. कॅरलीन गरोदर असल्याच्या कारणास्तव त्यांना जामीनही लवकर मिळाला होता. हे सर्व असताना नशेच्या आहारी गेलेल्या गणेश यांनी त्यांना अनेकदा लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून डोकेही आपटले. शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकीही दिली, असे कॅरलीनने तक्रारीत म्हटले आहे.
आधी पत्नी म्हणून नाकारणा-या गणेश यांनी नंतर पोलीस ठाण्यातच माफीही मागितली होती; परंतु, २६ जानेवारी रोजीही त्यांनी मारहाण केल्यामुळे याबाबतची तक्रार २८ जानेवारी रोजी कळवा पोलीस ठाण्यात केली. त्यावेळी मात्र पोलिसांनी आधार कार्ड तसेच लग्नाचा पुरावाही मागितल्याचा आरोप कॅटलीन यांनी केला. हुंडा घेण्यासाठी त्यांनी दुस-याही लग्नाचा घाट घातला. त्यामुळेच सतत अगदी लहान मुलांसमोरही मारहाण करून शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता. स्वत: पदरमोड करून गणेश यांच्यासह त्यांच्या भावाला आणि वडिलांचीही जामीनावर सुटका करण्यासाठी आपण प्रयत्न केले. परंतु, त्याच पतीकडून नगरसेवक असल्यामुळे आपल्याला प्रचंड त्रास दिला जातोय, त्यांच्यावर कारवाई करून न्याय मिळावा, अशी कैफियत त्यांनी मांडली आहे.
....................
या संदर्भात नगरसेवक कांबळे यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्यांचा फोन नॉट रिचेबल येत असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
---------------
‘गणेश यांच्याविरुद्ध यापूर्वीही हाणामारीसारखे गुन्हे दाखल आहेत. कॅरलीन यांच्याही तक्रारीची दखल घेण्यात आली आहे. या सर्वच पार्श्वभूमीवर त्यांच्याविरुद्ध तडीपारीचाही प्रस्ताव ठेवलेला आहे. ४९८ ची तक्रार दाखल करण्यापूर्वी कागदपत्रांची पडताळणी करावी लागते. म्हणून कॅरलीन यांच्याकडे लग्नपत्रिकेसह कागदपत्रे मागितली होती. ’
-शेखर बागडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कळवा पोलीस ठाणे.