उल्हासनगरचा स्टेशन परिसर भुरट्या चाेरांसह गर्दुल्ल्यांना आंदण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:45 AM2021-09-15T04:45:45+5:302021-09-15T04:45:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात गर्दुले, भुरटे चोर, नशेखोरांच्या विळख्यात सापडला आहे. शुक्रवारी अल्पवयीन मुलीवर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात गर्दुले, भुरटे चोर, नशेखोरांच्या विळख्यात सापडला आहे. शुक्रवारी अल्पवयीन मुलीवर या परिसरात अत्याचार झाला. तत्पूर्वी नशेखोरांकडून स्कायवॉकवर एका सेल्समनचा खून झाला होता. वारंवार घडणार्या अशा घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी स्टेशनच्या पूर्व-पश्चिम या दोन्ही बाजूला पोलीस चौक्या सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
उल्हासनगर हद्दीत शहाड, विठ्ठलवाडी, उल्हासनगर असे तीन रेल्वे स्टेशन असले तरी नागरिकांची सर्वाधिक वर्दळ उल्हासनगर रेल्वे स्टेशनवर आहे. स्टेशनच्या दोन्ही बाजूला असलेल्या स्कायवॉक तर गुन्हेगारांचा अड्डा झाला असून रात्रीच्या १० वाजल्यानंतर नागरिक एकटे स्कायवॉकवरून जाऊ शकत नाहीत. एवढी दहशत गर्दुल्ले, नशेखोर, भुरट्या चोरांची निर्माण झाली आहे. हे कमी म्हणून की काय शेजारील झोपडपट्टीत अंमली पदार्थांसह गावठी दारूची विक्री होत आहे. स्कायवॉकवरून जाणाऱ्या कॉलेज तरुण-तरुणीसह नागरिकांना लुटणे, मारामारी असे प्रकार नेहमी घडत असून एका सेल्समनने दारूला पैसे दिले नाही. या रागातून काही वर्षांपूर्वी गर्दुल्यानी धारदार शस्त्रांनी हल्ला करून खून केल्याची घटना यापूर्वी झाली. तसेच एका वाहतूक पोलिसांवरही जीवघेणा हल्ला केला होता. मध्यंतरी स्कायवॉकवर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता नंतर तो काढल्याने शुक्रवारची घटना घडल्याचे बोलले जाते.
रेल्वे स्टेशनच्या दोन्ही बाजूला पोलीस चौकी असून त्या २४ तास सुरू असल्याने गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक होता. मात्र, स्टेशनच्या नूतनीकरण वेळी स्टेशन पूर्वेतील पोलीस चौकीची जागा तुटल्यानंतर बंद केली. आता स्टेशन परिसरात गुन्हेगारी वाढल्याने ती सुरू करण्याची मागणी रिक्षा संघटनेसह नागरिक, राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केली.