उल्हासनगरात नेताजी चौकातील धर्मवीर आनंद दिघे यांचा पुतळा हटवला; परिसरात तणाव
By सदानंद नाईक | Published: July 4, 2023 05:12 PM2023-07-04T17:12:00+5:302023-07-04T17:12:10+5:30
उल्हासनगर कॅम्प नं-५ येथील नेताजी चौकाला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव दिल्याचा ठराव महापालिकेने मंजूर केला होता.
उल्हासनगर : कॅम्प नं-५ येथील नेताजी चौकात काही अज्ञात इसमानी महापालिकेच्या परवानगी विना सोमवारी धर्मवीर आनंद दिघे यांचा पुतळा बसविण्यात आला होता. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण होऊन पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. अखेर मंगळवारी महापालिकेने पुतळा ताब्यात घेतल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-५ येथील नेताजी चौकाला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव दिल्याचा ठराव महापालिकेने मंजूर केला होता. त्यानंतर पुन्हा त्याच चौकाचे नामांतर एका सिंधी संताचे नावाने करण्यात आल्याची माहिती मनसेचे माजी शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी दिली. धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव चौकाला दिल्यानंतर, त्याच चौकाचे दुसऱ्यांदा नामांतरण करण्याचा ठराव महापालिका मंजूर कसे काय शकते? असा प्रश्नही देशमुख यांनी केला. सोमवारी काही अज्ञात इसमानी चौकात पुतळा धर्मवीर आनंद दिघे यांचा पुतळा बसविल्यावर शिवसेना ठाकरे गटाच्या युवा विंगसह मनसेनेही आनंद व्यक्त केला होता. याप्रकारने चौकात तणाव निर्माण झाल्याने, सोमवार पासून पोलीस संरक्षणासह राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आले आहे.
दरम्यान नेताजी चौकात धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळा बसविण्यावरून झालेल्या तणावाला महापालिका जबाबदार असल्याचेही मनसेचे बंडू देशमुख म्हणाले. तर दुसरेकडे महापालिकेचे सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी पोलीस संरक्षणात चौकात बसविलेला दिघे यांचा पुतळा ताब्यात घेऊन सुरक्षितस्थळी ठेवला आहे. अशी प्रतिक्रिया शिंपी यांनी दिली. मात्र तणाव कायम असल्याने चौकात पोलीस संरक्षण व राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात ठेवल्या आहेत. नेताजी चौकात आनंद दिघे चौक असे नामांतराचे फलक कायम असून आनंद दिघे यांचा पुतळा पुन्हा बसविण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे