दुरवस्थेच्या गर्तेत युगपुरुषांचे पुतळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 03:18 AM2018-04-09T03:18:19+5:302018-04-09T03:18:19+5:30
मोठ्या व्यक्तींच्या स्मृती, त्यांच्या कार्याची माहिती पुढील पिढीला व्हावी, यासाठी पुतळे उभारले जातात. पण ते उभारल्यानंतर त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणे, त्यांची स्वच्छता राखणे, वेळोवेळी त्यांची देखभाल करणे हेही महत्त्वाचे काम आहे.
- प्रशांत माने
कल्याण- मोठ्या व्यक्तींच्या स्मृती, त्यांच्या कार्याची माहिती पुढील पिढीला व्हावी, यासाठी पुतळे उभारले जातात. पण ते उभारल्यानंतर त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणे, त्यांची स्वच्छता राखणे, वेळोवेळी त्यांची देखभाल करणे हेही महत्त्वाचे काम आहे. मात्र, त्याचाच अभाव दिसून येतो. सुरक्षेअभावी अनर्थ घडतो आणि त्यावरून सुरू होते राजकारण. हे टाळण्यासाठी पुतळ्यांना संरक्षण देणे स्थानिक संस्थांची महत्त्वाची जबाबदारी आहे.
कॅ
लेंडरमधील महा-पुरुषांच्या पुण्यतिथी आणि जयंतीवरही वाद झडत असताना कल्याण-डोंबिवलीत उभारण्यात आलेल्या युगपुरुषांच्या पुतळ्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे धक्कादायक वास्तव पाहायला मिळत आहे. पुतळे उभारले जातात, पण या स्मारकांच्या देखभालीकडे लक्ष द्यावे, असे मात्र कोणाला वाटत नाही. स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे पुतळ्यांवर दुरवस्थेची पुटे चढली आहेत. निवडणुकांच्या तोंडावर स्मारकउभारणीच्या घोषणा तसेच लागलीच भूमिपूजनाचा घाट घातला जातो. ही तत्परता स्मारक पूर्ण होते की नाही, ते कोणत्या अवस्थेत आहे, याबाबत मात्र नसते. अन्यथा, महापुरुषांच्या स्मृती विस्मृतीत जाण्यास आपणच कारणीभूत ठरणार नाही ना, याचीही जाण राजकारणी, प्रशासनातील अधिकाऱ्यांना करून देण्याची वेळ आली आहे.
गौरवशाली इतिहास हा महाराष्ट्रासाठी अभिमानास्पदच राहिला आहे. इतिहासातील प्रत्येक व्यक्ती त्या स्वातंत्र्यपूर्व काळातील का असेना, तिचे कार्य नेहमीच आपल्यासाठी प्रेरणादायी ठरले आहे. अशा महनीय व्यक्तींच्या कार्याची महती व्हावी आणि त्यापासून प्रेरणा घ्यावी, या अनुषंगाने पुतळे उभारण्याची संकल्पना उदयास आली. दरम्यान, ‘कोणी उठावे आणि टिकली लावून जावे’ या धर्तीवर राज्यात कुठेही सार्वजनिक अथवा खाजगी ठिकाणी पुतळे उभारले जात होते. पण, ११ जुलै १९९७ ला रमाबाईनगरात झालेल्या स्मारकविटंबनेच्या घटनेनंतर मात्र राज्य सरकारने पुतळे मंजुरीबाबत सावध भूमिका घेतल्याचे दिसून आले. यात सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यासह अन्य घटकांची परवानगी पुतळे, स्मारकासाठी घेणे बंधनकारक केले. पुतळ्यामुळे कायदा-सुव्यवस्था धोक्यात येणार नाही, याची दक्षता घेणे, हा यामागचा उद्देश असला, तरी या उद्देशाला हरताळ फासला जात असल्याचे चित्र कल्याण-डोंबिवलीत पाहायला मिळते. केडीएमसीच्या अधिकृत आढाव्यानुसार कल्याणमध्ये १०, तर डोंबिवलीत पाच पुतळे असल्याची माहिती देण्यात आली. पण, प्रत्यक्षात मात्र ठिकठिकाणी आढळणारे पुतळे पाहता त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची, हा यक्षप्रश्न आहे. विशेष बाब म्हणजे खाजगी संस्थांकडून सुरक्षेचे तीनतेरा वाजवले गेले असले, तरी जे पुतळे महापालिकेने उभारले आहेत, त्यांच्या सुरक्षेचेही प्रशासनाला आणि सत्ताधाºयांना गांभीर्य नसल्याचे वास्तव पाहायला मिळते.
यासंदर्भातील माहिती घेता कल्याणमधील दुर्गाडी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या तीनच स्मारकांना महापालिकेकडून सुरक्षा पुरवण्यात आली आहे. अपुºया मनुष्यबळाअभावी सुरक्षा पुरवता येत नसल्याचे कारण पुढे केले जात असल्याने उर्वरित १२ पुतळ्यांना ‘वाली’ कोण, अशी परिस्थिती आहे. काही स्मारके तर सुरक्षा नसल्याने आजघडीला गर्दुल्ले, मद्यपी, जुगाºयांचे अड्डे बनले आहेत, तर काहींना देखभाल दुरुस्तीअभावी अवकळा आली आहे. शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी चौकाचौकांत उभारण्यात आलेली शिल्पेही मोडकळीस आली असून बेकायदा फेरीवाले आणि वाहन पार्किंगच्या विळख्यात ही शिल्पे पूर्णपणे झाकली जात असल्याचे चित्र कल्याण पश्चिमेतील भवानी चौक आणि रेल्वेस्थानक परिसरातील जोतिबा फुलेंचे स्मारक पाहता दिसून येते. शहरातील बहुतांश स्मारके पाहता प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे दुरवस्थेच्या गर्तेत सापडली आहेत.
लोकगायक प्रल्हाद शिंदे यांचे स्मारक याचे प्रमुख उदाहरण आहे. यात प्रशासनाची अनास्था समोर येत असताना लोकप्रतिनिधीदेखील या अवस्थेला तितकेच जबाबदार आहेत. ज्यांचे नाव घेऊन सत्तेवर आले आणि इतकी वर्षे कारभार केला, त्या शिवसेनेला शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याभोवताली साकारलेल्या महाराष्ट्र शिल्पाची वाताहत झाल्याची जाणीव नाही, हे लांच्छनास्पद असून ज्यांच्या खांद्यावर पुतळ्याची सुरक्षा सोपवण्यात आली आहे, त्या सुरक्षारक्षकांचा जीव धोक्यात असल्याची प्रचीती डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील चित्र पाहता येते. याठिकाणी सुरक्षारक्षक तैनात असतो, परंतु त्याला दिलेली चौकीच धोकादायक आहे. महापालिकेने तसे जाहीरही केले आहे, पण चौकीची दुरुस्ती करायला पालिकेला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. याच उद्यानातील संरक्षक भिंतही तुटली आहे, पण आपल्या दालनांवर करदात्या नागरिकांच्या पैशांतून लाखोंची उधळपट्टी करणाºया लोकप्रतिनिधींना आणि प्रशासन अधिकाºयांना त्याचीही डागडुजी करायला वेळ नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. आता डोंबिवलीतही महापालिकेच्या विभागीय कार्यालयाच्या आवारात उभारला जाणार आहे. येथील पूर्वेकडील इंदिरा गांधी चौकात केडीएमसीच्या डोंबिवलीच्या विभागीय कार्यालयाच्या वास्तूजवळ या पुतळ्याची जागा निश्चित करण्यात आली आहे. त्यासाठी याठिकाणी असलेला केडीएमटीचा बसथांबा अन्यत्र हलवण्यात आला आहे. दरम्यान, शिवसेना गटनेते रमेश जाधव यांनी मात्र या जागेला हरकत घेतली होती. प्रशासनाने निश्चित केलेली जागा योग्य नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या प्रांगणात हा पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली होती. महापालिकेने सुचवलेली जागा ही अरुंद असून त्याच्या पुढील भागात रिक्षातळ आहे. त्याचबरोबर त्याच्या बाजूकडील भागातून स्कायवॉक गेलेला आहे. त्यामुळे पुतळ्याची जागा सुरक्षित नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले होते. परंतु, प्रशासनाने इंदिरा चौकातच पुतळा उभारण्याचा निर्णय घेतल्याने जाधव यांची मागणी अमान्य केल्याचे समोर आले. यातून सुरक्षेच्या बाबतीत प्रशासनाला कितपत गांभीर्य आहे, याची प्रचीती येते.