मूकबधिर असल्याचे भासवून चोरी करणारे गजाआड; तीन तासांत केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 12:37 AM2019-12-11T00:37:28+5:302019-12-11T00:37:43+5:30
४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; खडकपाडा पोलिसांची कामगिरी
कल्याण : मूकबधिर असल्याचे भासवून भिक मागण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करुन चोरी करणाऱ्या सत्यराज बोयर (१९) आणि बाबू बोयर (३०, दोघे रा. शहाड) या दोघा सराईत चोरट्यांना अवघ्या तीन तासांत खडकपाडा पोलिसांनीअटक केली. त्यांच्याकडून ३१ मोबाइल आणि एक डिजीटल कॅमेरा असा ३ लाख ९४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. या चोरट्यांच्या मूक-बधिरपणाच्या नाटकाला भुलून अनेकांनी आपले मोबाईल आणि किमती वस्तू गमावल्या आहेत.
आरोपी त्रिकुट ते मूकबधिर असल्याची कागदपत्रे लोकांना दाखवायचे. ‘भारत सरकारकडून मिळालेले सर्टिफिकेट’ असे लिहिलेले, त्याखाली पत्र देणारा मुका आहे, त्याचे घरातील सदस्यांना हातपाय नाहीत, त्याचे आईने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली आहे, असा पत्रात उल्लेख असायचा. भिक मागण्यासाठी गेलेल्या ठिकाणी सत्यराज आणि बाबू तेथील रहिवाशांना हे पत्र वाचण्यास देऊन त्यांच्याकडून आर्थिक मदतीसाठी याचना करायचे.
पत्र वाचल्यानंतर एखाद्याने मदत करण्याच्या उद्देशाने दरवाजा उघडा ठेवला तर, दुसरा साथीदार घरातल्या व्यक्तीची नजर चुकवून घरात प्रवेश करायचा आणि मोबाईल किंवा किमती वस्तू चोरी करून पोबारा करायचा. अशाच एका चोरीप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी अवघ्या तीन ते चार तासांमध्ये सत्यराज आणि बाबू या दोघांना अटक केली. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. या दोघांनी अजून किती जणांच्या घरी अशाप्रकारे चोरी केली आहे याचा तपास खडकपाडा पोलीस करीत आहेत.
च्घराच्या दरवाजाची कडी उघडून सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा ऐवज लांबवल्याची घटना मागील महिन्यात खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. खबºयाने दिलेल्या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी, पोलीस हवालदार बिजू शेले आणि पोलीस शिपाई विनोद चन्ने यांनी उत्तरप्रदेशातून सराईत गुन्हेगार आशिष उर्फ आशु राजोरिया (२४, रा. बदलापूर) याला अटक केली.
त्याच्याकडून चोरीला गेलेल्या ऐवजापैकी २ लाख २७ हजारांचा ऐवज हस्तगत केला. दुसºया गुन्ह्यामध्ये भरदिवसा घरफोडी करुन घराला आग लावणाºया मनोज कोनकर (२५, रा. आंबिवली) याला खडकपाडा पोलिसांनी अटक करत त्याच्याकडून टिव्ही, फ्रीज असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.