समृद्धी महामार्गावर ‘काळ’रात्र; ठाणे जिल्ह्यात ‘पोलादी’ सांगाडा कोसळला; क्षणांत कामगारांचा चेंदामेंदा, २० ठार, ०३ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 06:31 AM2023-08-02T06:31:04+5:302023-08-02T06:33:00+5:30

अवाढव्य क्रेनचा तोल गेला अन्...  

Steel skeleton collapses on Samriddhi Highway in Thane district; In moments 20 workers died 3 were injured | समृद्धी महामार्गावर ‘काळ’रात्र; ठाणे जिल्ह्यात ‘पोलादी’ सांगाडा कोसळला; क्षणांत कामगारांचा चेंदामेंदा, २० ठार, ०३ जखमी

समृद्धी महामार्गावर ‘काळ’रात्र; ठाणे जिल्ह्यात ‘पोलादी’ सांगाडा कोसळला; क्षणांत कामगारांचा चेंदामेंदा, २० ठार, ०३ जखमी

googlenewsNext

श्याम धुमाळ/जनार्दन भेरे -

कसारा/शहापूर (जि. ठाणे) : अचानक एखाद्या बाँबस्फोटासारखा आवाज आला आणि गर्डर लाँचर तुटून प्रचंड वजनाचे अजस्र लोखंडी गर्डर पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले. त्या गर्डरवर आणि त्याखाली उभे राहून काम करणारे कामगार, इंजिनीअर एकतर चिरडले गेले किंवा हादऱ्याने दूर फेकले जाऊन दूरवर आपटले. शहापूर तालुक्यातील सरलांबे गावाच्या हद्दीत समृद्धी महामार्गावर सोमवारी मध्यरात्री हा थरार घडला. या भीषण अपघातात २० कामगार आणि अभियंत्यांचा मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले.  

दैव बलवत्तर म्हणून पाच जण बचावले. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती आहे. अत्यंत वजनदार अशा लोखंडी गर्डरखाली सापडलेल्या कामगारांचा जागीच अक्षरश: चेंदामेंदा झाला. यापूर्वी समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सला आग लागून प्रवाशांचा कोळसा होण्याची दुर्घटना रात्रीच घडली होती. सोमवारची रात्रही तशीच काळरात्र ठरली. 

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम वेगाने सुरू आहे. गर्डर टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आले होते. ते सुरू असतानाच भीषण अपघात घडला. गेले काही दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या भागात चिखल पसरल्याने मदतकार्यात अडथळे निर्माण झाले. ढासळलेल्या क्रेनसह मलबा हटवण्यासाठी अजून दहा तास लागण्याची शक्यता एनडीआरएफ जवानांनी व्यक्त केली. 

नेमका कसा झाला अपघात?
- रात्री ११.५० समृद्धी महामार्गाच्या १६ नंबर पॅकेजमध्ये सोमवारी (दि. ३१) रात्री ११.५० वाजता ही घटना घडली.

- ११० फूट उंच पिलरवर गर्डर लाॅंचरद्वारे गर्डर चढविण्याचे काम सुरू हाेते.

- अचानक लाँचिंग क्रेनचा तोल ढासळला व गर्डरसह भलीमोठी क्रेन खाली कोसळली.

नेमके कारण काय?
लिफ्टमध्ये बिघाड, अर्थात वजन न पेलवल्याने किंवा पावसात काम सुरू असल्याने जमीन खाली खचली असल्याने ही दुर्घटना घडली असल्याचे प्रथमदर्शनी लक्षात येत आहे.

गर्डर व लाॅंचिंग म्हणजे काय?
पुलांचे बांधकाम करताना दाेन खांबांना जाेडणारे पाेलाद आणि काॅंक्रिटची रचना म्हणजे ‘गर्डर’. लाॅंचिंग गर्डर मशीनद्वारे जाेडण्यात येतात. या मशीनचे पाय दाेन खांबांवर बसविण्यात येतात. त्याला स्लायडर बीम जाेडण्यात येतात. त्यानंतर शक्तिशाली क्रेनच्या मदतीने स्लायडर बीमवर बाॅक्स गर्डर बसविण्यात येतात. यालाच गर्डर लाॅंचिंग म्हणतात. एका बाॅक्स गर्डरचे वजन १५० ते २०० टन असते. दाेन पिलरमध्ये असे जवळपास ६ ते ७ बाॅक्स गर्डर बसविण्यात येतात.

रात्रंदिवस काम
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील मुंबईला जोडणाऱ्या शेवटच्या शहापूरच्या १६ नंबरचे शेवटचे पॅकेज काम नवयुगा कंपनीकडे आहे. या कंपनीचे काम मोठ्या प्रमाणात बाकी असल्याने समृद्धी मार्ग लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने कमी वेळात जास्त काम करण्यासाठी रात्रंदिवस काम सुरू होते.

ठेकेदारावर दाखल झाला निष्काळजीपणाचा गुन्हा
गर्डर बसविणारे नवयुगा कंपनीचे ठेकेदार असलेल्या व्हीएसएल कंपनीवर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक अनंत पराड यांनी दिली. प्रेमप्रकाश अयोद्धा साव या मजुराच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. गर्डर लाँचिंग मशीनद्वारे गर्डर बसविण्याचे काम सुरू असताना सुरक्षिततेची कोणतीही खबरदारी न घेता निष्काळजीपणा केल्यामुळे हा अपघात घडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

Web Title: Steel skeleton collapses on Samriddhi Highway in Thane district; In moments 20 workers died 3 were injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.