कंटन्मेंट झोनसाठी महापालिकेचा अॅक्शन प्लॅन तयार कोरोना रोखण्यासाठी उचलली पावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 01:55 PM2020-06-06T13:55:39+5:302020-06-06T13:57:27+5:30
ठाण्याच्या झोपडपटटी भागात वाढणाºया कोरोनाला रोखण्यासाठी आता महापालिकेने अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार आता कंटन्मेंट झोनमधील प्रत्येक घर पिंजुन काढले जाणार आहे. घरोघरी जाऊन सर्व्हे केला जाणार असून फिव्हर क्लिनीक सुरु करण्यात आले आहेत.
ठाणे : ठाणे शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे ठाणेकरांसाठी ही समाधानाची बाब मानली जात आहे. परंतु आता कंटन्मेंट झोनमधूनही कोरोनाला हद्दपार करण्यासाठी महापालिकेने अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार या भागाचे येत्या चार दिवसात पूर्णपणे सर्व्हेक्षण केले जाणार आहे. यासाठी प्रत्येक कंटन्मेट झोनमध्ये २० ते ३० पथके तयार करण्यात आली आहेत. त्यानुसार ही पथके आता घरोघरी जाऊन सर्व नागरीकांची तपासणी करणार आहेत.
ठाणे शहरात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ४ हजारांच्या आसपास पोहचली आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. असे असेल तरी ठाण्यातील झोपडपटटी भागातील कोरोना रोखण्यात अद्यापही पालिकेला म्हणावे तितके यश आलेले नाही. त्यातल्या त्यात लोकमान्य सावरकरनगर भागात कोरोना रुग्ण वाढीची संख्या मागील काही दिवसात घटल्याचे दिसून आले आहे. या भागात पालिकेच्या वतीने प्रत्येक घरोघरी जाऊन तपासणी केली जात आहे. त्यामुळे एखाद्याला ताप असेल ंिकवा आणखी काही त्रास होत असेल तर त्यांना लगेचच क्वॉरन्टाइन करुन तीन ते चार दिवसांनी त्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. त्यामुळेच आता रुग्ण वाढीचा दर हा ४० ते ५० वरुन २० पर्यंत खाली आला आहे. परंतु दुसरीकडे वागळे, कोपरी नौपाडा, मुंब्रा आणि आता उथळसर भागातील अनेक झोपडपटयांमध्ये कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे लोकमान्य नगर भागात जो अंजेडा पालिकेने राबविला तोच अंजेडा आता या प्रभाग समितीमध्येही राबविली जाणार आहे.
शुक्रवारी महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी व्हिडीओ कॉनर्फन्सीद्वारे संबधींत विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन कंटन्मेट झोन भागातील प्रत्येक घराची तपासणी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. येत्या चार दिवसात या भागातील सर्व्हे पूर्ण झाला पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यानुसार आता महापालिकेच्या उपायुक्तांनी अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. कंटन्मेट झोनमध्ये जाऊन आता प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जाणार आहे, एखाद्याला ताप, श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा इतर काही लक्षणे असतील त्याला तत्काळ क्वॉरान्टाइन केले जाणार आहे. यासाठी प्रत्येक प्रभाग समिती अंतर्गत आता २० ते ३० पथके सज्ज करण्यात आली असून ही पथकांद्वारे थर्मल स्कॅनींग करुन इतर तपासणीही केली जाणार आहे. त्यानुसार प्रत्येक सहाय्यक आयुक्ताला देखील विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच या भागांमध्ये फीव्हर क्लिनीकही उभारण्यात येऊन त्याठिकाणी देखील तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. यासाठी स्थानिक नगरसेवकांची मदत घेऊन प्रत्येक घर पिंजुन काढले जात आहे.
त्यानुसार ५ जून पर्यंत नऊ प्रभाग समिती अंतर्गत १३२७० नागरीकांची तपासणी करण्यात आली असून त्यातील ५८ नागरीकांना तापाची लक्षणे दिसून आली आहेत. त्यातील केवळ २० नागरीकांना होम क्वॉरन्टाइन करण्यात आले आहे. तर ८ लोकांना कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच २८ नागरीकांनी महापालिकेच्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आल्याची माहिती उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली.