माझ्या वक्तव्यावर ठाम, मेलो तरी माफी मागणार नाही; जितेंद्र आव्हाडांची स्पष्टोक्ती
By जितेंद्र कालेकर | Published: August 1, 2024 08:38 PM2024-08-01T20:38:19+5:302024-08-01T20:38:47+5:30
आव्हाड यांच्या वाहनावरील हल्ल्याच्या निषेधार्थ ठाणे, मुंब्र्यात आंदोलन
ठाणे: छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल अनुद्गार काढल्याच्या कथित रागातून ठाण्यातील शरद पवार गटाचे आमदार जितेेंद्र आव्हाड यांच्या वाहनावर मुंबईत झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ ठाण्यातील विवियाना मॉल समोरील रस्त्यावर आणि मुंब्रा भागात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रस्ता रोको करुन निषेध व्यक्त केला. दरम्यान, आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असून मेलो तरी माफी मागणार नाही, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी व्यक्त केली.
आपल्या गाडीवर हल्ला करणारे तिघेच जण होते. माझ्याकडे चार पोलिस आणि त्यांच्याकडे ४० गोळया होत्या. गाडीमध्ये आपण पुढे बसलो होतो. त्यावेळी गाडीवर काहीतरी पडल्याचा आवाज झाला. आपण लक्ष देईपर्यंत ते पळून गेले. असल्या हल्ल्याने आपण डगमगत नसतो, या हल्ल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना आव्हाड म्हणाले की, मी छत्रपती संभाजी राजे यांचा सातत्याने आदरपूर्वक उल्लेख केला. पण आता यापुढे त्यांना राजे म्हणणार नाही. आपले वडिल खासदार झाले ही त्यांच्या मनातली आग आहे. त्यांच्या वडिलांनी त्यांचा निषेध केला. आपण मेलो तरी माफी मागणार नाही. त्यांनीच महाराष्ट्राची माफी मागावी, असेही आव्हाड म्हणाले.
दरम्यान, आव्हाड यांच्या वाहनांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मुंब्य्रात अमृतनगर भागात दुपारी ठामपाचे माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण आणि मर्जिया पठाण यांनी रस्ता रोको आंदोलन केले. ठाण्यात आव्हाड यांच्या निवासस्थानाजवळील विवियाना मॉलसमोर जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी काही काळ रस्ता रोको आंदोलन केले.