कोरोनाग्रस्तांच्या घरावर लागणार स्टिकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:38 AM2021-03-25T04:38:51+5:302021-03-25T04:38:51+5:30

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे ...

Stickers will be affixed on the houses of the victims | कोरोनाग्रस्तांच्या घरावर लागणार स्टिकर

कोरोनाग्रस्तांच्या घरावर लागणार स्टिकर

Next

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे महापालिकेने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून यापूर्वी एखाद्या इमारतीमध्ये कोरोना रुग्ण आढळला, तर प्रवेशद्वारावर फलक लावला जात होता; परंतु आता ज्या घरात रुग्ण आढळला असेल त्या घरावरच स्टिकर लावण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

ठाणे महापालिका हद्दीत कोरोना रुग्ण वाढीचा दर हा अचानकपणे १५ टक्क्यांपर्यंत आला आहे. त्यानुसार सध्या पाच हजार १८ प्रत्यक्ष उपचार घेणारे रुग्ण आहेत. यातील ५० टक्के रुग्ण हे घरी उपचार घेत आहेत, तर आतापर्यंत महापालिका हद्दीत ७० हजार २१७ रुग्ण आढळले. त्यातील ६३ हजार २८७ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, एक हजार ४३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मात्र, काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या पाचपटीने वाढू लागल्याने महापालिकेने ज्या- ज्या भागात रुग्ण आढळत आहेत, त्या- त्या भागात ताप सर्वेक्षण मोहीम सुरू केली आहे, तसेच बाधितांच्या संपर्कात आलेल्यांची शोधमोहीमही हाती घेतली आहे. याशिवाय काही ठिकाणी ज्या घरात कोरोनाचा रुग्ण आढळला आहे, त्या घरातील व्यक्ती इतरत्र फिरत आहेत. वास्तविक पाहता त्यांनी किमान १४ दिवस घरीच विलगीकरणात राहणे अपेक्षित आहे; परंतु तसे होताना दिसत नाही किंवा घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्याची माहितीदेखील इतरांना मिळत नाही. त्यामुळे आता महापालिकेने ज्या घरात कोरोनाचा रुग्ण आढळला असेल त्या घरावरच स्टिकर लावण्याचा निर्णय घेतला आहे. ते लावल्यावर किमान आजूबाजूच्या रहिवाशांना संबंधित घरात कोरोना रुग्ण आहे, याची माहिती होऊन तेदेखील दक्षता घेतील, हा उद्देश असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे, तसेच त्या घरातून इतर कोणीही किमान १४ दिवस बाहेर पडणार नाही, याची दक्षतादेखील सोसायटीवाले घेऊ शकणार आहेत.

कॉलिंगचे प्रमाण वाढविले

ठाणे महापालिकेने आता २५ जणांची टीम सज्ज ठेवली आहे. ही टीम एखादा कोरोनाबाधित घरी उपचार घेत असेल, तर त्याची रोजच्या रोज विचारपूस करणे, त्यांना कशाची गरज आहे का? याची माहिती घेत आहे. त्यानुसार मागील आठवडाभरात साडेचार हजार नागरिकांशी या टीमने संपर्क साधलेला आहे.

Web Title: Stickers will be affixed on the houses of the victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.