...तरीही शर्यत जिंकण्याची आस
By admin | Published: January 9, 2016 02:09 AM2016-01-09T02:09:05+5:302016-01-09T02:09:05+5:30
सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनासह सार्वजनिक शौचालयांचा पुरता बट्ट्याबोळ झाला असतानाही उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या ठाणे महापालिकेने केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत
अजित मांडके, ठाणे
सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनासह सार्वजनिक शौचालयांचा पुरता बट्ट्याबोळ झाला असतानाही उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या ठाणे महापालिकेने केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात स्वच्छतेच्या बाबतीत देशातील ७५ पैकी पहिल्या १० शहरांमध्ये क्रमांक पटकावण्याचा दावा केला आहे. याअंतर्गत केंद्राच्या एका त्रिसदस्यीय समितीने सलग तीन दिवस संपूर्ण शहराचा दौरा करून शहरातील शौचालये, सांडपाणी व्यवस्थापन आणि घनकचरा व्यवस्थापनाची माहिती घेऊन त्याचे आॅडिट केले आहे. त्यानुसार, पालिकेला स्वच्छतेबाबत ही रँक दिली जाणार आहे. त्यानुसार, प्रशासनाने हा दावा केला आहे.
महापालिकेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात विविध प्रकारच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. अभियानात शहरातील शौचालये, साफसफाई, कचऱ्याची वाहतूक आणि विल्हेवाटीवर भर दिला आहे. त्यानुसार, महापालिकेची सध्याची स्थिती पाहता शहरात आजघडीला सुमारे ५४ हजारांच्या आसपास सार्वजनिक, वैयक्तिक आणि सामूहिक शौचालये आहेत. परंतु, यातील हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्याच शौचालयांची अवस्था चांगली असून उर्वरितांची दैना झाली आहे. दरवाजे नसणे, कडी नसणे, विजेची सोय नाही, दुर्गंधी आणि साफसफाईचा उडालेला बोजवारा यातूनच त्यांच्या खऱ्या अवस्थेचा विचार होऊ शकतो.
दुसरीकडे घनकचरा व्यवस्थापनाचाही बोजवारा उडाला आहे. महापालिका हद्दीत आजच्या घडीला ६५० मेट्रीक टन कचऱ्याची निर्मिती होते. परंतु, गेल्या अनेक वर्षांत पालिकेला अद्यापही हक्काचे डम्पिंग मिळविता आलेले नाही. कचरा संकलन, वाहतूक जरी योग्य रीतीने होत असली तरी त्याची विल्हेवाट लावणे हा महत्त्वाचा प्रश्न आजही सोडविता आलेला नाही. एकूणच शौचालये आणि शहरातील कचऱ्याची अवस्था पाहता या दोन्ही यंत्रणांत पालिका सपशेल फेल ठरली आहे.
दरम्यान, पालिकेने आता स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून अत्यंत घाईने कचऱ्याच्या शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाटीसाठी विविध प्रयोग हाती घेतले आहेत. यामध्ये वूडवेस्ट, बायोवेस्ट, गांडुळ खत प्रकल्प, मेडिकल वेस्ट, कम्पोस्टिंगसह विविध प्रकारचे प्रकल्प हाती घेतले आहेत. तर, संपूर्ण शहर हगणदारीमुक्त करण्यासाठी सामूहिक १५००, वैयक्तिक १२००० आणि सार्वजनिक ५०० शौचालये उभारली आहेत. बायोटॉयलेटही उभारली जाणार आहेत. सांडपाणी व्यवस्थापनही लंगडे असून अनेक भागांत मलनि:सारण वाहिन्या टाकलेल्या नाहीत. तसेच अनेक ठिकाणचे सांडपाणी प्रक्रिया न करताच ठाणे खाडीत सोडले जात असल्याने ती कमालीची प्रदूषित झाली आहे.