...तरीही ‘रेमडेसिविर’ बाहेरून आणण्याचा सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 12:44 AM2021-04-20T00:44:29+5:302021-04-20T00:44:34+5:30
समितीच्या सूचनेनुसार, महापालिकेने एक फॉर्म तयार केला असून, ताे आरोग्य विभागाकडून खासगी रुग्णालयांना दिला जातो.
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी पुरवठा नियंत्रित करण्यासाठी जिल्हा नियंत्रण समिती स्थापन केली आहे. तसेच, रुग्णांच्या नातेवाइकांना इंजेक्शन बाहेरून आणण्यास सांगू नये, असे निर्देश दिलेले असतानाही खासगी रुग्णालयातील डाॅक्टर हे इंजेक्शन बाहेरून आणण्याचा सल्ला देत आहेत. त्यामुळे या इंजेक्शनबाबत कल्याण-डाेंबिवलीत अतिरेक सुरू असून, त्याबाबत रुग्णांचे नातेवाईक उघडपणे बाेलण्यास घाबरत आहेत.
समितीच्या सूचनेनुसार, महापालिकेने एक फॉर्म तयार केला असून, ताे आरोग्य विभागाकडून खासगी रुग्णालयांना दिला जातो. या फॉर्ममध्ये रुग्णाला कधी दाखल केले, उपचार कधीपासून सुरू केले, त्याचे नाव-पत्ता, त्याची ऑक्सिजनची पातळी, रक्तचाचण्या, त्याचा स्कॅन रिपोर्ट, रेमडेसिविर इंजेक्शन आवश्यकता, याबाबत तपशील भरून द्यायचा आहे. सायंकाळी सात वाजेपर्यंत हा तपशील महापालिकेस मिळाल्यानंतर ताे आरोग्य विभागाकडून समितीकडे पाठविला जाईल. रात्री दहा वाजेपर्यंत हा अहवाल समितीकडे पोहोचल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत आवश्यकतेनुसार कोणत्या पुरवठादाराकडून रेमडेसिविर इंजेक्शन मिळेल, याची हमी दिली जाईल. इतके सगळे असताना खासगी डॉक्टरांकडून थेट रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेरून इंजेक्शन आणा असे सांगितले जात आहेत.
१२ हजार इंजेक्शनची
केली आहे मागणी
महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यासंदर्भात म्हणाल्या की, खासगी रुग्णालयात आवश्यक असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा अहवाल जिल्हा नियंत्रण समितीला पाठविला जात आहे. महापालिकेच्या कोविड रुग्णालयात आजच्या दिवसापुरतेच रेमडेसिविर इंजेक्शनचे डोस उपलब्ध आहेत. महापालिकेने आणखी १२ हजार रेमडेसिविर इंजेक्शन मागविले आहेत. मागणी केलेले इंजेक्शन २० एप्रिलपर्यंत मिळणे अपेक्षित आहेत.