कासात भातरोपणी जोरात
By admin | Published: July 15, 2016 01:21 AM2016-07-15T01:21:00+5:302016-07-15T01:21:00+5:30
तालुक्यातील कासाभागात भात रोपणी व चिखलणीच्या कामास शेतकऱ्यांनी सुरूवात केली असून बऱ्याच ठिकाणी शेतकरी रोपणीच्या कामात व्यस्त दिसत आहेत
डहाणू : तालुक्यातील कासाभागात भात रोपणी व चिखलणीच्या कामास शेतकऱ्यांनी सुरूवात केली असून बऱ्याच ठिकाणी शेतकरी रोपणीच्या कामात व्यस्त दिसत आहेत. तालुक्यात प्रामुख्याने भात हे पीक घेतले जाते. भाताबरोबर माळरानावर शेतकरी नाचणी, उडीद आदी पिकेही घेतात. जून महिन्यात यंदा उशिराने पावसाला सुरूवात झाल्याने पेरण्याही उशिरा झाल्यात.
मात्र, बहुतेक शेतकऱ्यांनी इंजिन व मोटारपंपच्या पाण्याने पेरण्या केल्या होत्या. त्या शेतकऱ्यांनी आठवडाभरापासून रोपणीस सुरूवात केली आहे. कृषी खात्याकडून यंदा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. योग्य पाऊस पडत असल्याने रोपण्या वेगात सुरू असून सुरूवातीच्या काळात मजुरांची कमतरता भासत नाही. ज्या शेतकऱ्यांची रोपे अद्याप रोपणीस तयार झाली नाही त्यांनी चिखलणी, नांगरणी आदी कामे सुरू केली आहेत. मात्र पेरणी नंतर सतत पाऊस सुरू राहिल्याने काही ठिकाणी बियाणे पाण्यात वाहून गेली तर काही शेतकऱ्यांची बियाणे चिखलात गाडली गेल्याने अशा शेतकऱ्यांनी दुबार भात पेरणी केली आहे. (वार्ताहर)