एसटीला ठाण्याकडून ३९ लाख उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 03:54 AM2018-08-20T03:54:37+5:302018-08-20T03:54:58+5:30
पंढरपूरसाठी सोडलेल्या लालपरीमधून (एसटी) ३९ हजार १६६ प्रवाशांनी सुखकारक प्रवास केला आहे.
- पंकज रोडेकर
ठाणे : आषाढी एकादशी म्हटली की, वारकऱ्यांसाठी एक पर्वणीच असते. त्यानिमित्ताने पंढरपूरला लाखोंच्या संख्येने वारकरी माऊलीच्या दर्शनाला जातात. पंढरपूरसाठी सोडलेल्या लालपरीमधून (एसटी) ३९ हजार १६६ प्रवाशांनी सुखकारक प्रवास केला आहे. त्यामुळे एसटीच्या ठाणे विभागाला जवळपास ३९ लाखांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
२३ जुलैच्या आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जाणाºया भाविकांकरिता ठाणे परिवहन विभागाकडून ठाणे बसस्थानक, भिवंडी, कल्याण, विठ्ठलवाडी, डोंबिवली, वाडा, शहापूर, मुरबाड, बोरिवली नॅन्सी कॉलनी येथून १९ ते २९ जुलै या दिवसात एकूण ७६ बसेस जादा सोडण्याचे नियोजन केले होते. १९ जुलैपासून त्या सोडण्यात आल्या. २४ जुलैपासून चंद्रभागा बसस्थानक, पंढरपूर येथून परतीच्या वाहतुकीसाठी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन स्त्रिया व आबालवृद्धांना प्रवास सुखकर व्हावा, म्हणून एकूण जादा बसपैकी १० टक्के बसेस आगाऊ उपलब्ध करून दिल्या होत्या.
पुणेकरांसाठी पंढरपूरला जाण्यासाठी ठाणे परिवहन विभागामार्फत जवळपास ४० बसेस पाठवल्या होत्या. अशा प्रकारे पंढरपूरसाठी एकूण ११० बसेस नियोजित होत्या.
भारमान वाढले
या दिवसात भारमान ७१.४४ टक्क्यांनी वाढले होते. त्यातच, लालपरीच्या एकूण फेºयांमधून ३९ हजार १६६ प्रवासी सहभागी झाले होते. त्यातूनच ठाणे एसटी विभागाला ३९ लाखांचे उत्पन्न यंदा मिळाल्याची माहिती ठाणे विभागीय नियंत्रक शैलेश चव्हाण यांनी दिली.